Homeकोंकण - ठाणेसेक्‍सटॉर्शन’ मास्टरमाइंड गजाआड ! दगड झेलले, कपडे फाटले; तरीही आरोपीला पकडले

सेक्‍सटॉर्शन’ मास्टरमाइंड गजाआड ! दगड झेलले, कपडे फाटले; तरीही आरोपीला पकडले

सेक्‍सटॉर्शन’ मास्टरमाइंड गजाआड ! दगड झेलले, कपडे फाटले; तरीही आरोपीला पकडले

पुणे, दि. 22 – प्रतिनिधी.

सेक्‍सटॉर्शन’ अर्थात सोशल मीडियाद्वारे लैंगिक छळ करून खंडणीखोरीचे प्रकार मागील काही महिन्यांत वाढले आहेत. यातील एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पुणे-दत्तवाडी पोलीस राजस्थानातील गुरुगोठडी जि. अल्वर येथे गेले होते. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. या झटापटीत पोलिसांचे कपडे फाटले आणि आरोपी पळून गेला. मात्र, त्याही अवस्थेत पोलिसांनी तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करत आरोपीला अटक केली. हा आरोपी देशभरातील “सेक्‍सटॉर्शन’ गुन्ह्यांचा मास्टरमाइंड आहे.

अन्वर सुबान खान (29, रा. गुरुगोठडी, ता. लक्ष्मणगढ) असे आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी भागातील एका 19 वर्षीय तरुणाला सोशल मीडियाद्वारे एका अनोळखी तरुणीने मैत्रीची विनंती पाठविली होती. मैत्रीच्या जाळ्यात ओढून तरुणीने त्याला धमकावून पैसे उकळले होते. समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणाकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली होती. धमक्‍यांमुळे तरुणाने गेल्या महिन्यात इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. दरम्यान, यातील आरोपी हा राजस्थानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक रवाना झाले. आरोपी खानला पोलिसांनी गुरुगोठडी गावातून अटक केली. त्याच्याकडून दहा मोबाइल हस्तगत करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सोहेल शर्मा, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक अक्षय सरवदे, काशिनाथ कोळेकर, जगदीश खेडकर, अनूप पंडित, सूर्या जाधव आदींनी ही कारवाई केली.

न्यायाधीश आणि रेल्वेचा टीसीही ‘सावज’

दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला स्थानिक न्यायालयात ट्रान्सिट रिमांडसाठी हजर करुन दोन दिवसांच्या रिमांडची मागणी केली. मात्र, न्यायालयाने स्वत:हून चार दिवसांचा रिमांड दिला. न्यायाधीशांनी खासगीत दत्तवाडी पोलिसांना “मी ही “सेक्‍सटॉर्शन’ला बळी पडलो आहे. यामुळे आरोपीकडून जास्तीत जास्त माहिती मिळवून हा प्रकार थांबवला जावा म्हणून रिमांडची मुदत आणखी दोन दिवस वाढवून देत आहे,’ असे सांगितले. तर दुसरीकडे आरोपीला राजस्थानहून पुण्यात आणण्यासाठी ट्रेनची तिकिटे पोलिसांना मिळत नव्हती. त्यांनी टीसीला विनंती केली, मात्र त्याने तिकिटे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. टीसीला अटक आरोपी हा सेक्‍सटॉर्शनमधील गुन्हेगार असल्याचे सांगितले. तेव्हा “टीसीने मी देखील सेक्‍सटॉर्शनचा बळी’ असे सांगत पोलिसांना चार तिकिटे मिळवून दिली आणि पोलीस आरोपीसह पुण्यात
पोहचले. दरम्यान, या प्रकरणात अधिक तपासानंतर आणखी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.

महिला, मुलांसह संपूर्ण गावच “सेक्‍सटॉर्शन’च्या “उद्योगात’

मॉर्फ केलेली अश्‍लील छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे गुन्हे देशभरात घडत आहेत. दरम्यान, गुरुगोठडी गावातील आरोपी अन्वर खान याने गावातील मुले, महिलांना अशा प्रकारचे गुन्हे करण्यास प्रवृत्त केले होते. या गावात 500 घरे आहेत. येथील अनेक तरुण, महिला आणि लहान मुलेही सेक्‍सटॉर्शनच्या गुन्ह्यात सहभागी आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे हे एक मोठे साधन आहे. यामुळे मागील दोन वर्षांत गावातील सधनता वाढली आहे. पोलीस गावात आल्यास सर्व गाव एकत्र येऊन विरोध करत दगडफेक करते. यामुळे कारवाईसाठी परराज्यांतील पोलीस माघारी फिरतात. दत्तवाडी पोलिसांनी याची माहिती असल्याने त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क न साधता, थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सुरक्षा मागवली होती. तसेच पोलीस साध्या वेशात गावात गेले होते. यामुळे आरोपी त्यांच्या हाती लागला. मात्र गाववाल्यांनी दगडफेक करुन आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला.

आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला. मात्र, अडीच किलोमीटर पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पुन्हा पकडले. आरोपीचे शिक्षण फक्त पाचव्या इयत्तेपर्यंत झाले आहे. त्याच्या गावातील इतर तरुणही जेमतेमच शिकलेले आहेत. मात्र, तांत्रिक बाबतीत ते सरस आहेत. सहजासहजी पैसे मिळत असल्याने “सेक्‍सटॉर्शन’ची माहिती घेऊन घरोघरी एक दोन व्यक्ती प्रशिक्षित झाल्या आहेत. आता घराघरातील लोक देशभरातील नागरिकांना सेक्‍सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये कमवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.