लॉकडाउनमध्ये किमान १५ दिवसांची वाढ होण्याचा अंदाज. आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई. प्रतिनिधी. २८ एप्रिल.
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.
आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
