कोकणची लोककला जाकडीनृत्य म्हणजेच “शक्ती-तुरा “कला जोपासणे काळाची गरज.- लोककलेतुन आरोग्य,पर्यावरण,शैक्षणिक, सामाजिक जनजागृती.
.प्रतिनिधी.- शांताराम गुडेकर
[कोकणातील माणूस हा गणेशोत्सवात मनसोक्त मजा करतो.कोकणात जसं गणेशोत्सवाचं महत्व अधिक आहे.तसेच गणेशोत्सवात जाकडीनृत्य म्हणजेच शक्तीतुरा नृत्याचे महत्त्व आहे.शक्तीतुरा हे कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल.रत्नागिरी,सिंधुदुर्ग ,रायगड मध्ये हा नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो.कुणबी समाजातील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्य प्रकार म्हणून प्रसिध्द आहे.नृत्यातला थाट,गाण्याचा तालही व संगीत साधने कालपरत्वे बदलल्याने त्याचं मूळ स्वरुप पूर्णपणे बदलल्याचा अनुभव हे नृत्य पाहताना येतो.अशा या कोकणच्या जाकडीनृत्य म्हणजेच शक्तीतुरा लोककलेचा थोडक्यात परिचय …]
श्रावण महिण्यात गणेशोत्सवाची चाहूल लागल्यावर कोकणातील जाकडीनृत्याच्या सरावाची लगबग सुरु होते.पौराणिक ग्रंथ ,शास्त्राच्या आधारे कालपरत्वे चालत आलेल्या या कलगी-तुरा जाकडीनृत्याचा रंग मात्र आजच्या आधुनिक युगातही कोकणातील नवतरुण कलाकारांनी,शाहीर मंडळींनी अजूनही कायम ठेवलेला नाही तर त्याला आधुनिक पध्दतीची धार देण्याचे कार्य सुरु केले आहे.यामध्ये पुरुष शाहीरांप्रमाणे आता महिला शाहीर ,महिला शक्तीतुरा नृत्य पथकेही आता सहभागी होऊ लागली आहेत.
पुराणानुसार शक्ती(कलगी) म्हणजे आदिमाया पार्वती आणि तुरा म्हणजे श्री शिवशंकर होय.कलगी-तुरा असे दोन फड एकमेकांमध्ये आळीपाळीने पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे या दोन्ही फडाचे बुवा (गायक)आपआपल्या कल्पकतेनुसार खास गाण्यांच्या चालीवर आपापली बाजु मांडत असतात.एकमेकांमध्ये प्रश्न टाकून त्यात कल्पकतेने शास्त्राच्या आधारे त्या प्रश्नाची उत्तरेही एकमेकांना पटवून देतात.त्याचवेळी या नृत्य पथकातील सहभागी तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर आधुनिक पध्दतीने आपल्या पथकातील गायकाच्या गायनाला साथ देत असतात यालाच म्हणतात शक्तीतुरा नृत्य .
वाद्यांची जमवाजमव झाली की श्रावण महिण्याच्या सुरुवातीपासूनच कोकणातील गावागावात प्रत्येक वाडीवस्तीवर ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज सोबतच नविन नविन चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवर रचना केलेल्या गाण्यांचे सुर घुमू लागतात.कोकणातील या जाकडीनृत्य कलाकारांनी आपापली मंडळे स्थापन करुन ती शक्तीतुरा संघाकडे नोंदणी केलेली असतात.या नृत्य पथकांनी द-याखो-यात आपल्या पहाडी आवाजाचे सुर घुमवत न ठेवता थेट मुंबईतील नाट्यगृहात प्रवेश करुन मुंबईकरांना या नृत्य प्रकाराची भूरळ घातली.अर्थातच हे व्यवसायीकरण होणे ही काळाची गरज होती.कारण त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून ही जाकडीनृत्य मंडळे आपल्या गावाच्या,वाडीच्या विकासाच्या कामाला हातभार लावताना दिसत आहेत.मुंबईतील साहित्य संघ मंदिर,परलचे दामोदर नाट्यगृह ,विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृह ,मुलुंडचे कालिदास नाट्यगृह ,ठाण्याचे गडकरी रंगायतन,वाशीचे विष्णूदास भावे नाट्यगृह ,घाटकोपर येथील झवेरिबेन नाट्यगृहातून या शक्तीतुरा कला पथकांचे प्रयोग होतात.अनेकदा ते हाऊस फुल होतात.शासनाचे अनुदान असलेले नाट्यप्रयोग ५०,७५,१०० प्रयोगानंतर बंद पडतात.मात्र कोणत्याही प्रकारचे शासनाच्यावतीने अनुदान नसतानाही फक्त आणि फक्त रसिकांच्या सहकार्यामुळे शक्तीतुरा नृत्याचे १००० प्रयोग सादर करण्याचा मान कोकणच्या शक्तीतुरा चे महानायक शाहिर शंकर भारदेगुरुजी,महागायक शाहीर मधुकर पंदेरे, लोकशाहीर तुकाराम मानकर यांना मिळाला हे कोकणचे भाग्यच आहे.आज साई श्रध्दा कला पथक(संदिप कानसे ग्रुप),एस.भारती,श्री पाणबुडी देवी कला मंच(संतोष घाणेकर, दीपक कारकर, रमेश भेकरे, रमेश कोकमकर ),संजय मांडवकर ग्रुप,अवि -अनिल ग्रुप याशिवाय किशोर चंद्रकांत नगरकर यांचे श्री.हनुमान नृत्य कलापथक,मु.पो.नातोड़ीं,(सोनारवाड़ी)ता.महाड,जि. रायगड,नव तरुण नृत्य कला पथक-पारदले वाडी फरारे,आदी व्यवसायिक स्वरुपात मुंबईसह कोकणात कार्यरत असून या ग्रुपच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना रोजगार मिळाला आहे.तसेच रामचंद्र घाणेकर,दिलीप नामे,विजय पायकोळी,दत्ता आयरे,शंकर जाधव,वसंत भोईर ,तुषार पंदेरे ,रत्नाकर महाकाळ,चंद्रकांत साळवी,मंगशे मोरे,देवेंद्र झिमण,संतोष कानसे,विजय कुळेकर,गजानन टकरे,दत्ता गराटे,अवि-अनिल गराटे,निलेश जोगले ,दिनेश सनगले(वांझोळे), शाहिद खेरडकर(चिपळून),सचिन धुमक,नितिन रसाळ,प्रकाश पांजणे ,विनोद फतकरे,संदीप मोरे, उमेश पोटले,किशोर सनस,अंकुश गुरव,रामचंद्र सुर्वे ,दामोदर गोरिवळे ,रोहीदास भारदे,तांबे,डाफले,दिनेश बनदगळे, योगेश मुकनाक,राजाराम जाधव,नितिन पवार,नितीन म्हसकर,अमोल कानसे,वैभव नामे,सचिन कदम, निलेश पवार,पुनम आगरकर,सौ.प्रीती भोवड-वीर, श्वेता घडशी,प्रीती कांबळे,संगिता पांचाळ ,पुनम कोंडगेकर,तेजल पवार,ऋदळी दळवी,विशाखा फुटाक आदी पुरुष-महिला शक्तीतुरा शाहीर ही कला जोपासण्यासाठी प्रयत्न केले आहेत..करत आहेत… पुढेही करतील यामध्ये तिळमात्र शंका नाही.रसिकांची केलेली सेवा यांचेच हे प्रतिक मानावे लागेल.म्हणूनच हा नृत्य प्रकार आजही अविरतपणे सुरु आहे.पुढेही सुरुच राहिल यांची यामुळे खात्री वाटते.शिवाय प्रमाणिकपणा व जिध्द यामुळेच हा नृत्य प्रकार व नामांकित शाहीर रसिकमायबापांना आकर्षित करु शकले.नाहीतर सामाजिक संदेशाचा भान असणारा जाकडीनृत्य कलाप्रकार दुर्मिळ होत गेला असता.सद्दस्थितीचा विचार करता जाखडी नृत्यातील मूळ स्वरुप पूर्णतः बदलले आहे.व्यवसायीकरणाच्या बळावर नवनव्या चित्रपटांच्या गाण्यांच्या उच्च स्वरांच्या चालींचा आता शक्तीतुरा गायनातील गाण्यांमध्ये सर्रास समावेश आढलतो.पूर्वीची लयबद्द चाल,नृत्यातील अस्सल ठेका आता कोकणातही अनुभवता येत नाही.कोकणातही मुंबईकरांसारखी चढाओढ पहायला मिळते.मात्र या शक्तीतुरा स्पर्धेत आजही जनजागृती करणारी गाणी म्हणून वृक्षरोपण करा,झाडे लावा ती जगवा,अवयवदान करा,पाणी वाचवा,मुलगी वाचवा,वृक्षतोड थांबवा,शिक्षणाचा प्रचार व प्रसार,आरोग्यविषयक जनजागृती यावर कवन केले जाते.यापूर्वी शक्तीतुरा या नृत्य प्रकारावर फक्त पुरुषांचेच क्षेत्र होते.मात्र आज शक्तीतुरा या नृत्य प्रकारात महिलांचा सहभाग लाभत आहे.त्यामुळे महिला शक्तीतुरा होऊ लागल्याने पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून या क्षेत्रातही इतर क्षेत्राप्रमाणे महिलांनी आघाडी घेतली आहे.ही गोष्ट ही कोकणासाठी अभिमानास्पद आहे.आजचे पुरुष-महिला शाहीर शासकिय योजनांचा गाण्यांच्या माध्यमातून प्रचार -प्रसार करताना दिसतात.यामध्ये हुडांबळी,स्री शिक्षण,अंधश्रध्दा निर्मूलन ,पर्यावरण संतुलन ,स्रीभूणहत्या, स्वच्छता अभियान इ.विषयांवर गाणी गाऊन शाहीर एकाचवेळी हजारो नागरिकांना जनजागृतीचा सल्ला देत आहेत.म्हणून या लोककलेचे महत्त्व लक्षात घेऊन या कलेला शासनाच्यावतीने आश्रय मिळाला पाहिजे.शासन या लोककलाकारांना वाचवेल तरच ही लोककला जिवंत राहिल.यासाठी या शक्तीतुरा लोककलेला शासनाच्यावतीने अनुदान मिळायला हवे.या कलेला लोकाश्रय मोठ्या प्रमाणात मिळणे काळाची गरज आहे.
कोकणची पारंपारिक गौरी-गणपती उत्सवातील हा शक्तीतुरा नृत्य प्रकार जोपासायचा असेल तर मुंबईतील नाट्यगृहात सादर होणारा व्यवसायिक दृष्टिकोनातून शक्तीतुरा सामना कोणतेही गालबोट न लावता सादर व्हायला पाहिजे .कारण सद्दस्थितीचा विचार करता काही शाहीर डबल अर्थी गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकतात.मात्र अशा गाणातून शासनदरबारी संदेश चुकीचा जातो व शक्तीतुरा शासनाच्यावतीने दुर्लक्षितच राहतो.हे थांबायला हवे.शिवाय ही कला सादर होत असताना रसिकमायबापांनी कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता कोकणची ही शक्तीतुरा लोककला जीवंत ठेवण्यासाठी प्रमाणिकपणे प्रतिसाद दयायला पाहिजे.आयोजक ,संयोजक यांनीही ही कला सादर होत असताना कार्यक्रम दरम्यान गोंधळ निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्यायला हवी.विनाअनुदानही शक्तीतुरा कला जोपासण्यासाठी कोकणातील अनेक मंडळ,संस्था,शाहीर मंडळी व त्यांचे शिष्य प्रमाणिकपणे प्रयत्न करताना (काही अपवाद वगळता)दिसत आहेत.इतर कलांना जसे शासनाच्यावतीने संरक्षण देण्यात आले आहे तसेच संरक्षण कोकणातील या शक्तीतुरा लोककलाकारांना देऊन कलाकारांचा गौरव करायला हवा.शाहीर मंडळी व त्यांच्या शिष्य गणांनी आपल्या गुरुचा आदर ठेऊन गाण्यात,नृत्यात अश्लिलता न ठेवता कोकणचा आत्मा समजल्या जाणाऱ्या या शक्तीतुरा कला प्रकाराची प्रतिमा अबाधित राखण्याचे प्रमाणिकपणे प्रयत्न करावेत व शक्तीतुरा कलेचे रक्षण करावे ही आमची प्रमाणिक अपेक्षा !
