तुकोबारायांच्या पालखीचे आज सोमवारी दुपारी होणार प्रस्थान. –
देहूनगरी झाली सज्ज. –
इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला.
देहू,:- प्रतिनिधी.

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी दि.२० जून रोजी दुपारी अडीचला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देऊळवाड्यातील भजनी मंडपात होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त भजनी मंडपाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून रविवारी (दि.१९) अनेक दिंड्या देहूत दाखल झाल्या. पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विविध गावांतील वारकरी आणि भाविक वाहनांमधून दाखल झालेले आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल झाले.मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देहू नगरपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे.
शासनाच्यावतीने निर्मल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ८०० शौचालय देहूत उभारली आहेत. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने विविध ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॉलीश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व, रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले.
प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी होती. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दहा टॅंकर देहूत उपलब्ध करून दिले आहेत. नगरपंचायत प्रशासनाकडून चोवीस तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॉन यांच्यावतीने भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. विविध ठिकाणी पालखी सोहळ्यातील भाविकांना मदत करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी केली आहे.