गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आघाडीची उमेदवार यादी जाहीर.
कोल्हापूर : प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाने उमेदवारांची यादी जाहिर केली. विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल बारा संचालकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे पुत्र चेतन नरके, गडहिंग्लजमधून सदानंद हत्तरकी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शौमिका महाडिक हे नवीन चेहरे दिले आहेत.
सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अयोध्या लॉन येथे मंगळवारी दुपारी सत्तारुढ गटाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. सत्तारुढ गटाचे पॅनेल हे सर्वसमावेशक आहे. गोकुळमधील काही संचालक सत्तारुढ गटामधून बाजूला गेले असले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. ठरावधारक आणि सभासद हे सत्तारुढ गटासोबत आहेत. यामुळे निवडणुकीत सत्तारुढ गटाचा विजय निश्चित असल्याचा दावाही नेत्यांनी केला.
गोकुळमध्ये गेली अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक हे नेतृत्व करत आहेत. मात्र ते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आजपर्यंत निवडणूक लढविली नव्हती. यंदा गोकुळच्या निवडणुकीसाठी त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली। पत्रकार परिषदेला माजी मंत्री भरमू पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, संजय घाटगे उपस्थित होते.
【 सत्तारुढ आघाडीतील सर्वसाधारण गटातील उमेदवार : चेअरमन रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, उदय निवासराव पाटील, सत्यजित सुरेश पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रविश पाटील-कौलवरक, प्रताप शंकरराव पाटील , प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले,रणजित बाजीराव पाटील. आदीचा समावेश आहे.