रत्नागिरी दिवा पॅसेंजरमधून पडून मुंबई पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. –
सुकीवली गावाजवळ घडली घटना
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
मे महिन्याचा सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे, त्यामुळे कोकणात मुंबईवरुन आलेले चाकरमनी आता सुट्ट्या संपल्याने ते पुन्हा मुंबईकडे परतू लागले आहेत. सध्या कोकणातील चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने आता बस, रेल्वेत प्रचंड गर्दी दिसत आहे.रेल्वेतील गर्दीमुळेच मुंबईकडे परतणारा पोलीस कर्मचारी रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सुकीवली गावानजीक रत्नागिरी दिवा पॅसेंजर जात असताना घडली.
मुंबई पोलिसात असणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव उमेश पांडुरंग भोसले असून ते गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.मुंबई पोलिसात असलेले उमेश पांडुरंग भोसले हे दापोलीतील टेटवलीमध्ये मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. काही दिवसांची सुट्टी घालवून ते पुन्हा मुंबईकडे कामावर रुजू होण्यासाठी जात होते.रत्नागिरी दिवा पॅसेंजरला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजावर थांबून रेल्वेतून जात होते. ते रेल्वेच्या दरवाजावर थांबले असतानाच रेल्वे सुरु झाली, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित उभाही राहता आले नसल्याने हात सुटून ते चालत्या रेल्वेतून खाली पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
पुढील उपचारासाठी मुंबईला
सुकावली गावाजवळ ते रेल्वेतून पडल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिका मागवून घेण्यात आली, मात्र ते धावत्या रेल्वेतून पडून जखमी झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
