मंकीपॉक्सचा धोका ! महाराष्ट्र सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी…
मुंबई. – प्रतिनिधी.
एका बाजुला कोरोनाचा धोका दोन वर्षांनंतर कमी होत चालला आहे. आता कुठे नागरिकांना निर्बंधातून दिलासा मिळाला आहे. तोपर्यंत मंकीपॉक्सने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. भारतात केंद्र सरकारने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून ICMR ला यावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रातही सुरक्षेच्या कारणास्तव मार्गदर्शक जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारने संभाव्य धोका लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तर मुंबई महापालिकेनेसुद्धा नियमावली जारी केली आहे. नागरिकांनी घाबरू नये, सावधानता बाळगावी असं आवाहन बीएमसीने केलं आहे.
मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशांमध्ये गेल्या २१ दिवसात ज्यांनी प्रवास केला आहे त्यातील सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावं. तसंच संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर आरोग्य विभागाकडे देण्याची सूचना देण्यात आली आहे.
मंकीपॉक्सच्या टेस्टसाठी रक्त, थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येईल. टेस्टिंग केल्यानतंर एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाच तर त्याचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात येईल. काँट्रॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचे असून गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब शोधावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. क्वारंटाइनच्या कालावधीबाबतही नियमावलीमध्ये माहिती देण्यात आली आहे. संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होईपर्यंत आणि त्वचेचा नवा एक थर तयार होईपर्यंत क्वारंटाइन कालावधी असेल.
BMC कडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष.
मुंबई महापालिकेकडून मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर काही पावले उचलली आहेत. अद्याप तरी मुंबईत संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून जिथे मंकीपॉक्सचा संसर्ग झालेला आहे तिथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित प्रवाशांची आवश्यक ती तपासणी केली जात आहे. तसंच संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांसाठी याठिकाणी २८ बेड तयार ठेवले आहेत. संशयित रुग्णांचे तपासणीसाठी नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या गेल्या आहेत.
