सर्फनाला धरणाचे काम प्रकल्पग्रस्तांनी आज बंद पाडले
जिल्हाधिकाऱ्यांसोबत निर्णायक बैठक होत नाही तोपर्यत काम करू न देण्याचा निर्धार.
आजरा- प्रतिनिधी. १९
प्रशासनाकडून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने व संघटनेसोबत ठरलेल्या बैठका ऐनवेळी पुढे ढकलल्या जात असल्याने आज सर्फनाला धरणग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जात धरणाचे काम बंद पाडले. यावेळी बोलतांना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले आम्ही प्रशासनाला मदत करीत आलो याचा अर्थ प्रशासनाने आमच्यासोबत कसेही वागावे असा नाही. तुम्हाला केवळ आंदोलन आणि संघर्षाची भाषा कळत असेल तर आम्हीही त्याच भाषेत तुमच्याशी व्यवहार करू. गेले दोन तीन महिने जिल्हाधिकारी यांच्या सोबत कांही धोरणात्मक प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होणे आवश्यक असतांना जिल्हाधिकारी यांना वेळ नाही. ठरलेल्या बैठकाही अचानक रद्द केल्या जातात याचा अर्थ पुनर्वसन विभाग आणि जिल्हा प्रशासन धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही असा होतो. त्यामुळे आता आम्हाला धरणाचे काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी यांचेसोबत निर्णायक बैठक होऊन प्रलंबित प्रश्नांचा कालबध्द कार्यक्रम ठरत नाही तोपर्यंत धरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
खेडगे गावाच्या पुनर्वसनाचा/ विस्तारित गावठाण विकसित करण्याचा प्रश्न असो की आंबडे गट नं 86 मधील तिसऱ्या वसाहतीचा प्रश्न असो या मुद्द्यांसह शिल्लक राहिलेल्या जमिनीसाठी रस्ता, धरणपायात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना जमीन वाटपाचे आदेश, संकलन दुरुस्ती, परपोली घरांचे संपादन, वाढीव जमीन संपादन, निर्वाह भत्ता यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी अशी मागणीही यावेळी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आधी पुनर्वसन मगच धरण, जमीन आमच्या हक्काची अशा घोषणा देत प्रकल्पग्रस्त धरणस्थळावर आले. घोषणा देऊन धरणाचे काम बंद पाडले. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, दशरथ घुरे, शंकर ढोकरे, गंगाराम ढोकरे, हरी सावंत, अनिल अमूनेकर, धोंडिबा सावंत, एकनाथ गुंजाळ, धाकू कविटकर, वसंत राणे, बाबू ढोकरे, तुकाराम शेटगे, मोतेश बारदेस्कर, गोपिका डेळेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
