भारतरत्न,गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओची २ वर्षांपूर्वीच शिवसेना नेत्याच्या मुलाकडून खरेदी.- कोल्हापूकर संतापले!
(‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण.)
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं भव्य स्मारक बनवण्याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे.मात्र, लता मंगेशकर यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वीच एका शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आता कोल्हापूरकरांना समजली आहे. ज्यामुळे कोल्हापुरात याबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोल्हापूरच्या मंगळवार पेठ इथं जयप्रभा स्टुडिओ अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भालजी पेंढारकर यांनी लता मंगेशकर यांना 1959 साली जयप्रभा स्टुडिओची तेरा एकर जागा साठ हजार रुपयाला विकली होती. अनेक नाट्य, चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालं आहे. भालजी पेंढारकर 1959 साली आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक जैस्वाल यांना स्टुडिओचा काही भाग विक्री करून रहिवासी संकुलासाठी खरेदीचा व्यवहार झाला.त्यावेळी कोल्हापुरातील कलाकारांनी रस्त्यावर उतरून लता मंगेशकर यांच्या जयप्रभा स्टुडिओतील रिकाम्या जागेची विक्री करत असल्याच्या निषेधार्थ अनेक वेळा आंदोलन केलं होतं. मात्र तेरा एकरपैकी दहा एकर जागा लता मंगेशकर यांनी 2008 साली विवेक ओसवाल यांना विकत दिली. तर उर्वरित स्टुडिओ साधारण तीन एकर ही जागा जनआंदोलनामुळे नंतर मंगेशकर कुटुंबीयांनी कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये अस्तित्व कायम राहील असा शब्द दिला होता.
लता मंगेशकर यांचं आठ दिवसांपूर्वीच निधन झालं त्यानंतर त्यांचं स्मारक बनावं यासाठी हालचाली सुरू झाल्या. पण कोल्हापुरातील जागृत नागरिकांना हा स्टुडिओ दोन वर्षांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून विकला असल्याचं समोर आलं असून त्यासाठी शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन मुले पुष्कराज राजेश क्षीरसागर, ऋतुराज राजेश क्षीरसागर, यांच्यासह सात भागीदारांसह याचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, कोल्हापुरात कला क्षेत्रासाठी शाहू महाराज संस्थानकडून ही जागा भालजी पेंढारकर यांना देण्यात आली होती. त्याठिकाणी जयप्रभा स्टुडिओची रचना करून भालजी पेंढारकर यांनी अनेक चित्रपटांचं शूटिंग केलं होतं. पण नंतर ती जागा त्यांनी लता मंगेशकर यांना विकली होती. कोल्हापूरमध्ये कलावंत घडावेत या हेतून या जागेत हा स्टुडिओ उभारला गेला होता.जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून एकीकडे कोल्हापूरकर गेली 10 ते 12 वर्षे आंदोलन करत आहेत. मात्र कोल्हापूरकरांना अंधारातच ठेवून राजकीय बड्या नेत्याच्या मुलांनी हा जयप्रभा स्टुडिओ 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आज समोर आली आहे.
आठ दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांचं निधन झालं त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व मुख्यमंत्री स्तरावर लता मंगेशकर यांचे स्मारक बनावं याची चर्चा सुरू होती. यासाठी जयप्रभा स्टुडिओची चाचपणी करण्यात येत असतानाच हा स्टुडिओ 15 फेब्रुवारी 2020 रोजी विक्री झाल्याचे स्पष्ट झालं.
दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तर विधानसभेचे शिवसेना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ‘मुलांनी हा व्यवहार केलाय हे मला माहीतच नाही.’ यावेळी राजेश क्षीरसागर असं म्हणाले की, ‘कोल्हापूरकरांसाठी हा स्टुडिओ परत देऊ. सरकारने हा खरेदी केला तर मी व माझी मुलं तो स्टुडिओ परत देऊ.”हा स्टुडिओ महापालिकेने आपल्या ताब्यात घेऊन सरकारने पर्यायी जागा द्यावी.’ अशी मागणीही राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.
कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून लता मंगेशकर यांच्या वतीने काही जणांनी मध्यस्थ करून हा व्यवहार घडवून आणल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, व कृती समितीचे समन्वयक रमेश पवार, अशोक पवार, यांनी सांगितले.जयप्रभा स्टुडिओचे भालजी पेंढारकर यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अर्जुन नलवडे याबाबत बोलताना म्हणाले की, ‘झालेला व्यवहार गैर असून सखोल चौकशी करावी. भालजी पेंढारकर यांच्या पडत्या काळात त्यांनी आर्थिक समस्या असताना लता दीदींना हा स्टुडिओ विकला होता.”कोल्हापूरच्या अनेक लोकांना या स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी मिळत होती. अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षात कोल्हापूरकरांनी हा स्टुडिओ अस्तित्व कायम राखण्यासाठी प्रयत्न केला पण आज हा संपूर्णपणे विकल्याचे माहिती समजली. हे दुर्दैव मानावे लागेल.आता कोल्हापुरातील कलावंत कलाकार यांनी स्टुडिओ अस्तित्व कसं राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘जयप्रभा’साठी आजपासून साखळी उपोषण
भारतरत्न,गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओच्या ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वीच लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ विकल्याचे स्पष्ट झाले आहे.हा स्टुडिओ शूटिंगसाठीच राहिला पाहिजे. जोपर्यंत स्टुडिओ उघडून तेथे शूटिंगला सुरवात होत नाही, तोवर चित्रपट महामंडळाबरोबरच कलाकार व तंत्रज्ञांतर्फे स्टुडिओच्या दारात आज रविवारपासून साखळी उपोषण होणार आहे.याबाबतचा निर्णय चित्रपट महामंडळात शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिली.स्टुडिओ शूटिंगसाठी तत्काळ खुला झाला पाहिजे, जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित राहावी व शूटिंगव्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये,कोल्हापूर महापालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायीकीकरण- वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये, जयप्रभा स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे आदी मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी झाला. बैठकीला सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, सतीश बिडकर, स्वीकृत संचालक रवी गावडे, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अभिनेते स्वप्नील राजशेखर, माजी नगरसेविका सुरेखा शहा, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अमर मोरे, अर्जुन नलवडे, बाबा पार्टे, विजय शिंदे, अवधूत जोशी, संग्राम भालकर आदी उपस्थित होते.
शासनाकडे वारंवार मागणी.
राज्य जयप्रभा स्टुडिओ विकत घेऊन तो चित्रनगरीचाच एक भाग म्हणून चालवावा, ही मागणी चित्रपट महामंडळाने सातत्याने लावून धरली. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून पाठपुरावा केला आहे. आजही हा पर्याय उपलब्ध असून संबंधित खासगी कंपनीकडून ही जागा शासनाने घ्यावी आणि चित्रनगरीचा एक भाग म्हणून तेथे शूटिंग व चित्रपटविषयक उपक्रम सुरू करावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
महामंडळाबरोबर कोणतीही चर्चा नाही!
महालक्ष्मी स्टुडिओतर्फे शनिवारी सचिन राऊत यांच्या वतीने महापालिका प्रशासकांना एक पत्र देण्यात आले आहे. त्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार हे पत्र देत असून स्टुडिओच्या जागेच्या बदल्यात शहरात अन्यत्र जागा मिळाल्यास स्टुडिओची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास तयार असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, याबाबत महामंडळाला विश्वासात घेतले नसल्याबद्दलही बैठकीत संतप्त भावना व्यक्त झाल्या.
जनहित याचिका दाखल करणार
जयप्रभा स्टुडिओच्या जागेवरील आरक्षण कायम राहण्यासाठी महापालिकेत ठराव झाले; पण शासन पातळीवर पुढे फारसे प्रयत्न झाले नाहीत. स्टुडिओची विक्री बेकायदेशीर असून त्याविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले. जयप्रभा स्टुडिओला मोठी परंपरा आहे. त्यामुळे स्टुडिओच्या अस्तित्वासाठी सनदशीर मार्गाने जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पत्रक महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

