कोल्हापूर. प्रतिनिधी.
राज्याच्या राजकारणात जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपबरोबर असल्याने कोल्हापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना जनसुराज्यने पाठिंबा देण्याचा निर्णय सोमवारी रात्री येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आ. डॉ. विनय कोरे यांनी मतदारांना कितीही अडचणी आल्या तरी पक्षाला कमीपणा येऊ देऊ नका, असे आवाहन केले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
तर अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता
विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मालमत्ता 21 कोटींवर आहे. महाडिक यांच्याकडे 1 लाख 64 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. 6 लाख 37 हजारांच्या ठेवी तसेच 79 लाखांचे शेअर्स तसेच पोस्ट, एनएसएस आदी ठिकाणी 18 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. महाडिक यांनी विविध कंपन्या, ट्रस्ट तसेच मित्र, कुटुंबे आदींना 8 कोटी 49 लाख इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाडिक यांच्याकडे 25 लाखांचे दागिने, एक चारचाकी आहे.