Homeकोंकण - ठाणेशुभारंभ गळीताचा की सत्तासंघर्षांचा? आजरा कारखान्यात...

शुभारंभ गळीताचा की सत्तासंघर्षांचा? आजरा कारखान्यात गळीत शुभारंभप्रसंगी सत्ता संघर्ष उफाळला….

आजरा कारखान्यात गळीत शुभारंभप्रसंगी सत्ता संघर्ष उफाळला

ज्योतिप्रसाद सावंत (कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी)

आजरा साखर कारखाना गळीत शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून पुन्हा एकवेळ मानापमान नाटयास सुरूवात झाली आहे .या नाट्यास अनेक राजकीय कंगोरे आहेत . जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे नाव हेतूपूर्वक निमंत्रण पत्रिकेवरून बाजुला केले असल्याचा आरोप करत शिंपी समर्थक ऊस उत्पादकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे .तर शिंपी यांना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रा.सुनील शिंत्रे यांनी स्पष्ट केल्याने तालुक्यातील सद्यस्थितीस सुरू असणार्या राजकीय घडामोडींचा एक भाग म्हणून प्रा.शिंत्रे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंपी विराेधकांनी खेळलेली ही राजकीय खेळी असल्याचीही सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे .त्यामुळे हा शुभारंभ गळीताचा शुभारंभ म्हणण्याऐवजी तालुक्यातील आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सत्तासंघर्षांचा नव्याने शुभारंभ असेच म्हणावे लागेल .

सध्या जिल्हा बँकेतील राजकारणावरून तालुक्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे .जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांना उघड पाठींबा जाहीर केला आहे .अशोकअण्णा चराटी यांनी जयवंतराव शिंपी यांनी जरी पाठींबा जाहीर केला असला तरीही जिल्हा बँकेतील ही लढत काटातोड होणार असल्याचेही स्पष्ट होत आहे .तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर देसाई व अण्णा भाऊ संस्थासमूहाचे प्रमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी अशी जिल्हा बँकेकरीता थेट लढत होणार आहे .अत्यल्प मतांच्या फरकाने निवडणुकीचा कौल ठरणार आहे .राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसह स्थानिक मंडळींनी संयमाची भूमिका घेत सावध पावले टाकली आहेत .या राजकीय घडामोडींचाच एक भाग म्हणून शिंपी यांना गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आले असल्याचा आरोप शिंपी समर्थक करताना दिसतात .

मुळातच वेळोवेळी दुखावल्या गेलेल्या शिंपी समर्थकांना या निमित्ताने आयते कोलीत देण्याचे काम विरोधकांनी केले आहे. पण अडचणीत असलेल्या आजरा साखर कारखान्याच्या गळीत शुभारंभप्रसंगी असे घडणे निश्चीतच योग्य नाही.

अध्यक्ष प्रा. शिंत्रे व संचालक मंडळींनी शर्थीचे प्रयत करून कारखाना दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर सुरु केला आहे. एकीकडे सर्वांच्या सहकार्याची गरज असताना असे घडणारे प्रकार कारखान्यात अडथळा निर्माण करू शकतात याचा विसर पडता कामा नये. आता स्वतः शिंपी हा मुद्दा कितपत ताणवणार? यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

कारखाना संचालक मंडळाची मुदत केंव्हाच संपली आहे. पंचवार्षिक निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. सभासद व ऊस उत्पादक बिनविरोध निवडणुकांची अपेक्षा बाळगून आहेत. पण जिल्हा बँक राजकीय घडामोडीचे पडसाद जर असेच वेळोवेळी उमटत राहीले तर मात्र आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत ‘बिनविरोध ‘ची अपेक्षा बाळगणे कितपत रास्त आहे? असा प्रश्नही उपस्थित होवू लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.