कोल्हापूर. प्रतिनिधी. २४
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहापदरी प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्त बैठक आज कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यात 2019 व 2019 च्या पूर परिस्थितीमुळे महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक मार्ग बंद राहिले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यादृष्टीने महामार्गांचे प्रकल्प बनविण्याबाबतची सूचना* केली.
कोल्हापूर शहर प्रवेशद्वारा नजीक शिरोली ते मार्केटयार्ड पर्यंत शहरात येण्यासाठी नवीन उड्डाणपूल करण्यात येत आहे. यामुळे पूरपरिस्थितीतही शहरात प्रवेश करणे शक्य* होईल. तावडे हॉटेल चौकानजीक पंचगंगा नदी ते सांगली फाट्यापर्यंत पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन ’13 बॉक्सेस कलवर्ट्स’ची तरतूद* करण्यात आली आहे. यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.
कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार व आमदार यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून महामार्गाच्या प्रस्तावित कामांमध्ये दुरुस्ती करावी.* तसेच करण्यात येणाऱ्या दुरुस्ती बाबत माहिती द्यावी. हे कामे गतीने सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले.
तसेच, नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या कामाबाबत येत्या पंधरा दिवसांत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार* आहे.
बैठकीस, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार मानसिंग(भाऊ) नाईक, आमदार अरुण लाड, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, एनएचएआयचे मुख्य महाप्रबंधक व क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, महाप्रबंधक मधुकर वाठोरे, प्रकल्प संचालक वसंत पंधरकर, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
