नवी दिल्ली, वृतसंस्था २९ .
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सांगितले जात आहे, की अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दाखल झाल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अमरिंदर सिंग मंगळवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत आणि ते कालच अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र नवज्योतसिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यानंतर काँग्रेस मंत्रिमंडळातील चार सदस्यांनी राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली. या सर्व घडामोडींमुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. मात्र काल अमरिंदर सिंग यांनी आपण अमित शाह यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करून दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आल्याचे सांगितले होते. मात्र आज कॅप्टन व शाह यांच्या भेटीने ते लवकरच भाजपवासी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
केंद्रीय कृषीमंत्री पद मिळण्याची शक्यता:-
अमरिंदर सिंग लवकरच काँग्रेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे कॅप्टन सिंग यांना कृषिमंत्री पद मिळाल्यास शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात त्यांची कसोटी लागू शकते.
पंजाब काँग्रेसचे २६ आमदार ईडीच्या रडारवर होते, त्यात अमरिंदर सिंग यांचे पुत्र रणइंदर सुद्धा.
केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करताना पंजाब काँग्रेसचे आमदार देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर ते काँग्रेस मदार मोदी सरकारच्या निशाण्यावर असल्याचं वृत्त होतं. विशेष म्हणजे त्यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांचाही समावेश होता. त्यांची फाईल तब्बल ४ वर्षांनी पुन्हा उघडल्यानंतर ईडीने काँग्रेस आणि अमरिंदर सिंग समर्थक तब्बल २६ आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरु केली होती.
पंजाबमध्ये ईडीने बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना नोटीस पाठविण्याच्या तयारीत होती. त्यानंतर ईडीची कारवाई होणार असल्याचे समजताच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानी बैठक देखील पार पडली होती. विशेष म्हणजे या कारवाईसाठी ईडीला मोदी सरकारची देखील परवानगी मिळाली होती असं वृत्त होतं. त्यासाठी ईडीच्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांनी जालंधरमध्ये तळ ठोकला होता आणि ईडीच्या ऑफिसमध्ये फाईल्स तपासण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ईडीच्या चौकशीच्या हालचालींमुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र सध्याच्या पंजाबमधील घडामोडींनी अमरिंदर सिंग, त्यांचा मुलगा रणइंदर आणि अमरिंदर सिंग समर्थक आमदारांना आयती संधी चालून आली आणि सध्या त्या ईडीच्या रडारवरील सर्व काँग्रेस आमदारांना गुजरात वॉशिंग पावडरने स्वच्छ करण्याची संधी मिळाली आहे.