आजऱ्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होणार.( तरुण पिढीचे लक्ष दहीहंडीकडे) { हिंदू तेज सूर्य श्री. धनंजय भाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती }
आजरा | प्रतिनिधी :

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आजरा येथे धर्म आणि संस्कृतीचा संगम असलेला दहीहंडी उत्सव बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता आजरा हायस्कूलच्या पटांगणावर उत्साहात साजरा होणार आहे. मा. राघव सरदेसाई युवा मंच यांच्या वतीने या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास हिंदू तेज सूर्य श्री. धनंजय भाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बजरंगदल गोरक्षक दल, सिंधुदुर्ग यांचाही या सोहळ्याशी सहभाग आहे.
श्रीकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीक म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. गोकुळातील दही-लोण्याच्या हंड्या श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत फोडत असत, अशी धार्मिक मान्यता आहे. याच परंपरेतून आज उंचावर बांधलेली हंडी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचून फोडली जाते.
एकजूट, संघभावना, धैर्य आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक व युवक सहभागी होणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भव्य दहीहंडी सोहळ्यांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
आजऱ्यातील नागरिकांनी या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राघव सरदेसाई युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.




