मिरवणुकीत बेधुंद नाचला, घरी परतला अन् आईच्या मांडीवर जीव सोडला; डॉल्बीच्या दणदणाटाने कुटुंब उद्ध्वस्त!..
कोल्हापूर : – प्रतिनिधी.
राज्यात डॉल्बीच्या समर्थन आणि विरोधावरून वातावरण तापलं आहे. कुणासाठी डॉल्बी उत्सवाचा आनंद आहे… तर कुणासाठी हाच दणदणाट आयुष्यभराची वेदना बनलाय. कोल्हापुरातल्या डोईफोडे कुटुंबानं मागील एका वर्षापासून त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे जीवनातला आनंद गमावलाय. त्यांचा मुलगा अभिषेक डॉल्बीविरोधात नव्हता. गणेशोत्सवात तो उत्साहानं सहभागी होत होता. मात्र गणपतीच्या मिरवणुकीतून परतल्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि आईच्या कुशीत त्यानं अखेरचा श्वास घेतला.
मनीषा डोईफोडे यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण त्यांच्या मनात आणि घरात त्यांचा मुलगा अभिषेकच्या आठवणीत. अभिषेकच्या लहानपणीचा फोटो पाहून त्यांना गलबलून येतं. अभिषेकला गणेशोत्सव प्रचंड आवडायचा. गणेशोत्सवातील मिरवणुकीत अभिषेक बेधुंद हऊन नाचायचा. 28 ऑगस्ट 2025 रोजी एका छोट्या मुलाला खांद्यावर घेऊन अभिषेक गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत उत्साहात नाचला होता. रस्त्यावर गर्दी झाली होती, गुलालाची उधळण होत होती, कानठळ्या बसवणारा डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. गणपतीचा सण आनंद घेऊन आला होता. पण काही तासांतच सगळं बदललं. सुभाषनगरमध्ये मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीनंतर अभिषेक अस्वस्थ झाला. अभिषेक घरी आला, त्याने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि काही क्षणांतच सगळं संपलं.
मनीषा आणि अनिल डोईफोडे यांचा संसार आधीपासूनच कष्टाचा. चप्पल तयार करण्याचं काम करून दोघे घर चालवत होते. घरही मोठं नाही. अवघी 10 बाय 15 फुटांची खोली. या छोट्याशा घरात मोठी स्वप्नं होती, मुलाच्या भविष्याची आशा होती, पण आज त्याच घरात अभिषेक नाही. आता फक्त आठवणी आहेत. कष्टाच्या चार पैशांवर चालणाऱ्या या घराला अभिषेकच्या रूपाने मोठा आधार होता. अभिषेकच्या वडिलांची वेदना आणखी मोठी आहे. अनिल यांच्या दोन्ही हातांमध्ये अपघातामुळे रॉड आहेत. हातांनी कष्ट करणं कठीण आहे. मुलगा होता त्यामुळे उद्याची चिंता काहीशी कमी होती. मात्र आता भविष्याचं चित्र चिंतेनं भरलेलं आहे.
अभिषेकची आजी शालन यांच्या डोळ्यांसमोरही तो दिवस आजही तितकाच जिवंत आहे. आजी वेदनेनं सगळ्यांना सांगतात, डॉल्बी आनंद नाही, मृत्यू आहे. अभिषेकच्या कुटुंबाची ही वेदना पाहून नातेवाईकही आता डॉल्बीच्या वापरावर प्रश्न उपस्थित करताहेत. कारण काही तासांच्या मिरवणुकीनं त्यातील डॉल्बीच्या दणदणाटानं डोईफोडे कुटुंबाच्या घरातली शांतता मात्र कायमची हिरावून नेली. 23 वर्षांच्या अभिषेकच्या मृत्यूनं एका कुटुंबानं आधार आणि उमेद गमावली आहे. ही वेळ कुणावरही येऊ नये.
सौजन्य एक नजर मागील घडलेल्या दुःखद घटनेबाबत




