घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; १ लाख ४५ हजारांच्या दोन म्हशी हस्तगत.
आजरा | प्रतिनिधी.
आजरा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व जनावरांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना आजरा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आजरा पोलीस ठाण्यात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेहान इसाक मुल्ला (वय १९, रा. वाडा गल्ली, आजरा) व बुजेफ जमीर मुराद (वय २१, रा. वाडा गल्ली, आजरा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी ९ ऑगस्ट रोजी आवंडी वसाहत येथून म्हशीची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व आजरा पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.
