Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन🟣शासकीय सही-शिक्क्यांचा...

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन🟣शासकीय सही-शिक्क्यांचा गैरवापर अन् १२ एकर जमिनीचा बनावट फेरफार. ( शासकीय जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस.

🟣संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
🟣शासकीय सही-शिक्क्यांचा गैरवापर अन् १२ एकर जमिनीचा बनावट फेरफार. ( शासकीय जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस.

🟣संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
( देवर्डे येथे ४ सप्टेंबरला परंपरेचा होणार जागर..)

आजरा.- प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जन्मजयंतीनिमित्त पुणे महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री विठ्ठल मंदिर, देवर्डे, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा, वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी रसिकांना अनुभवता येणार आहे. भक्तिगीते, अभंग, कीर्तन, वारकरी परंपरा तसेच संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा जागर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
देवर्डे व परिसरातील नागरिक, वारकरी, भाविक आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

🟣शासकीय सही-शिक्क्यांचा गैरवापर अन् १२ एकर जमिनीचा बनावट फेरफार. ( शासकीय जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचा प्रकार उघडकीस.

चंदगड | प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील गट क्रमांक २३० मधील सुमारे १२ एकर (४.७९ हेक्टर) वर्ग-२ शासकीय जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यासाठी बनावट शासकीय कागदपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून त्यावर डिजिटल सही व जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या आदेशाच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. बनावट आदेशाच्या आधारे फेरफार
मळवीवाडी येथील गट क्रमांक २३० मधील शासकीय जमिनीचा वर्ग-२ वरून वर्ग-१ करण्यासाठी बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा आदेश तहसील तसेच ग्राममहसूल कार्यालयात सादर करण्यात आला. त्यानंतर संबंधित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार करण्यात आला. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत ही जमीन सुमारे २९ लाख रुपयांना विकली गेल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकारातून बनाव उघड
या संपूर्ण प्रकाराला माहिती अधिकाराच्या माध्यमातून धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी संबंधित आदेशाची प्रत मागविल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असा कोणताही आदेश पारित झालेला नसल्याचे लेखी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे समोर आले.
महसूल अधिकाऱ्यांची पोलिसांत फिर्याद
प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रभारी नायब तहसीलदार शशिकांत बापूसाहेब किल्लेदार यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार शासकीय कागदपत्रांचा गैरवापर, बनावट आदेश व शासकीय फसवणुकीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिसांच्या हाती लागलेली नसून तिचा शोध सुरू आहे. सोशल मीडिया खात्यावरील हालचालींच्या आधारे तपास यंत्रणा शोध घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याचे समजते.
महसूल यंत्रणेतील ‘अदृश्य हात’ कोण?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एका खाजगी व्यक्तीला अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश, डिजिटल सही व शासकीय शिक्का तयार करून त्याच्या आधारे महसूल अभिलेखात फेरफार करून घेणे एकट्याच्या बळावर शक्य आहे का? फेरफार प्रक्रियेत नेमके कोण सहभागी होते, जमिनीचा प्रत्यक्ष लाभ कोणाला झाला आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई होते की महसूल प्रक्रियेतील संबंधितांचीही चौकशी होते, याकडे चंदगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.