🟣 जबरदस्तीने वर्गणी जमा करू नये – डॉल्बी मुक्त श्री.गणेश उत्सव साजरा करण्याचे आजरा प्रशासनाचे आवाहन.
🟣उत्तुरमध्ये आधुनिक बसस्थानक व ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी.
( बस स्थानकासाठी प्रत्यक्ष खर्च रु ८० ते रु ९० लाख असल्याचा दावा )
🟣जबरदस्तीने वर्गणी जमा करू नये.- डॉल्बी मुक्त श्री.गणेश उत्सव साजरा करण्याचे आजरा प्रशासनाचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.

श्री गणेश उत्सव अनुसंगाने तहसील कार्यालय आजरा येथे दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश उत्सव मंडळे अध्यक्ष, पदाधिकारी , शांतता कमिटी, महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक बोलण्यात आली होती.
अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक
आजरा पोलीस ठाणे बाबासाहेब सरवदे यांनी स्वागत केले.
या बैठकीत गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत साजरा करण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या. तालुक्यातील ११६ गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सरवदे यांनी गणेशोत्सव मंडळांनी रजिस्ट्रेशन करणे, स्पीकर परवाना घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक मंडळाने मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मिरवणुकीदरम्यान CO₂, लेझर व प्रेशर प्लेटचा वापर करू नये. तसेच साऊंड सिस्टीम दोन बेस व दोन टॉपपेक्षा अधिक असल्यास परवानगी मिळणार नाही. डॉल्बीला कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नसल्याचे सपोनि श्री. सरवदे यांनी स्पष्ट केले श्री गणेश उत्सव मिरवणूक एका ठिकाणी विनाकारण रेंगाळत ठेवू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आजरा शहरातील मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. देणगीसाठी जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा देत, जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला.
तहसीलदार समीर माने यांनी गणेश मंडळांच्या मिरवणुकीत आक्षेपार्ह बॅनर अथवा मजकूर लावू नये, तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन केले. महाप्रसादासह अन्नवाटपाचे उपक्रम आयोजित करताना अन्न व औषध प्रशासनाची आवश्यक परवानगी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गणेश मंडळांनी सामाजिक व विधायक उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांनी गणेश मंडळांनी वीज कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, तसेच मंडपामध्ये शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी सुरक्षित विद्युत यंत्रणा बसवावी, असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी व वायरमन संतोष डोंगरे उपस्थित होते.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य पाण्यामध्ये टाकू नये. निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून घनकचऱ्यासोबत योग्य पद्धतीने संकलित करण्याच्या सूचना केल्या.
आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरत सुर्वे यांनी शहरातील गणेश मंडळांनी नगरपंचायतीची रीतसर परवानगी घ्यावी, तसेच गणेश विसर्जनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मूर्तीदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड होणार नाही महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे यासाठी मंडळांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. महिलांच्या सबलीकरणासाठी गणेश मंडळांनी समुपदेशन व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल, असे माजी सभापती रचना होलम यांनी सांगितले.
आजरा महावितरणचे अधिकारी, आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟣 उत्तुरमध्ये आधुनिक बसस्थानक व ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी.
( बस स्थानकासाठी प्रत्यक्ष खर्च रु ८० ते रु ९० लाख असल्याचा दावा )
आजरा .- प्रतिनिधी.
उत्तुर ता. आजरा व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासह आरोग्यसेवेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी गर्जना संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की उत्तुर ता. आजरा येथे दुप्पट मोठे व आधुनिक बसस्थानक तसेच बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे.
सध्याच्या प्रस्तावापेक्षा अधिक सुविधा असलेले बसस्थानक उभारून त्यातील व्यावसायिक गाळे उत्तुर ग्रामपंचायतीला देण्यात यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. त्यातून ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन गावाच्या विकासाला हातभार लागेल. त्याचबरोबर ५० खाटांचे रुग्णालय झाल्यास अपघातग्रस्त, सर्पदंश झालेले रुग्ण तसेच गर्भवती महिलांना वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचू शकतील.
या दोन्ही प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि दर्जेदार कामाची हमी मिळावी, तसेच निविदा प्रक्रिया, परवानग्या, बांधकामाचा दर्जा आणि खर्चाचे नियमित लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. उत्तुर बसस्थानकासाठी प्रशासकीय मान्यता रु ४१० लाख, निविदा रु २८३ लाख आणि प्रत्यक्ष खर्च रु ८० ते रु ९० लाख असल्याचा दावा / आक्षेप पुढे करण्यात आला असून, या रकमेतील तफावत स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र चौकशी व लेखापरीक्षण करून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आधुनिक बसस्थानक आणि ५० खाटांचे रुग्णालय हे उत्तुरच्या आरोग्य, वाहतूक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे प्रकल्प ठरतील असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गर्जना संघटनेने म्हटले आहे.
