राज्यातील ५३ हजार ६३७ बहिणींची पदरी निराशा! ( रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा थांबला हप्ता.)
मुंबई : प्रतिनिधी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची पडताळणी तसेच ई-केवायसी प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे ५३ हजार ६३७ महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही.
योजनेच्या निकषांनुसार २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जातो. पडताळणीमध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचा योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे.
राज्य सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. अर्जदारांची संख्या मोठी असल्याने आधार, ई-केवायसी, उत्पन्न, कुटुंबातील शासकीय कर्मचारी तसेच अन्य पात्रता निकषांची पडताळणी करण्यात आली. एप्रिलअखेरपर्यंत सुमारे ९२ लाख नोंदी अपात्र ठरविण्यात आल्या असून, लाभार्थी संख्या सुमारे १.६५ कोटींवर आली आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय विभागाला मिळालेल्या निधीतून रक्षाबंधनापूर्वीपर्यंत ८५ लाख महिलांच्या खात्यांमध्ये सुमारे २ हजार १५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थींना रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वयाच्या निकषामुळे सुमारे ५३ हजार महिलांना जुलैचा हप्ता मिळणार नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
