गोकुळ निवडणुकीसाठी आजरा तालुक्यात सतेज पाटील यांचा झंझावाती दौरा
( दौऱ्याला आजरा तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद.)
आजरा.- प्रतिनिधी.
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या उपस्थितीत आजरा तालुक्यातील विविध गावांमध्ये ठरावधारक, दूध उत्पादक व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. बहिरेवाडी, मुमेवाडी, उत्तूर, आर्दाळ, मडिलगे, देवकांडगाव, कोरीवडे, पेरणोली, किणे व कोळिंद्रे या गावांचा दौरा करण्यात आला.
आजरा शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आजरा गोकुळ दूध संघ, आजरा अर्बन बँक व जनता बँक सभागृहात बैठका घेऊन ठरावधारकांशी चर्चा करण्यात आली.

जनता बँक सभागृहातील बैठकीत गोकुळच्या मागील पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. मुकुंददादा देसाई यांनी संघाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत आजरा तालुका बंटी पाटील यांच्या नेतृत्वासोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादकांच्या हितासाठी मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा मांडला. सुग्रास खाद्याचे दर स्थिर ठेवणे, दूध दरात वाढ, तसेच करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्पामुळे संघाचा वीज खर्च कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
“गोकुळसारख्या शेतकरी हिताच्या संस्थेचे निर्णय स्थानिक पातळीवर होणे आवश्यक आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करू,” असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी अंजना रेडेकर, अभिजीत तायशेटे, रणजीतसिंह पाटील, विद्याधर गुरबे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, सुनिल शिंत्रे, मुकुंददादा देसाई यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी, ठरावधारक व कार्यकर्ते उपस्थित होते. राजू होलम यांनी आभार मानले.
या दौऱ्याचे नियोजन आजरा गोकुळ टीम सतेजच्या माध्यमातून करण्यात आले. गावोगावी झालेल्या संवादामुळे गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
