Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सील प्रकरणी सरपंच संघटनेने अधिकाऱ्यांना विचारला जाब.🟡आजरा महाविद्यालयात ‘इंग्लिश-वीक’...

हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सील प्रकरणी सरपंच संघटनेने अधिकाऱ्यांना विचारला जाब.🟡आजरा महाविद्यालयात ‘इंग्लिश-वीक’ उत्साहात; विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

🟡हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सील प्रकरणी सरपंच संघटनेने विचारला जाब.
🟡आजरा महाविद्यालयात ‘इंग्लिश-वीक’ उत्साहात; विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण.

🛑हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सील प्रकरणी सरपंच संघटनेचा अधिकाऱ्यांना विचारला जाब.- अशा अधिकाऱ्यांची फक्त बदली नको – ठोस कारवाई करा.

आजरा : प्रतिनिधी.

हाजगोळी ग्रामपंचायत कार्यालय सील केल्याच्या प्रकरणावरून आजरा तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पंचायत समिती आजरा येथे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची भेट घेत या संपूर्ण प्रकरणाबाबत जाब विचारला. हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय १९ ऑगस्ट रोजी सील करण्यात आल्याची यापूर्वीही नोंद झाली आहे.
हाजगोळी येथील ग्रामसेवक यांच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याअनुषंगाने गटविकास अधिकारी श्री सावंत यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी श्री कुंभार यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय सील केले. मात्र, त्याच रात्री उशिरा ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई अथवा दप्तर तपासणी न करता पुन्हा सील उघडण्यासाठी अधिकारी गेल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ग्रामस्थांनी विरोध केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.
या प्रकरणी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदार अधिकारी जाब विचारताना, संबंधित ग्रामसेवक ज्या-ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या तक्रारी असतानाही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पंचायत समितीला ग्रामपंचायत कार्यालय सील करण्याचे अधिकार आहेत का? ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार केवळ ग्रामपंचायतीचे दप्तर सील करायचे असल्यास संबंधित कपाट सील करणे योग्य असताना संपूर्ण कार्यालय सील करण्याचा अधिकार कोणी दिला? चुकीच्या पद्धतीने सील करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? आणि ज्या ग्रामसेवकामुळे हे प्रकरण निर्माण झाले त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? असे संतप्त सवाल सरपंच संघटनेने उपस्थित केले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामसेवक येळणे यांची बदली करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावर सरपंच संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. “ग्रामसेवकाची बदली करून प्रश्न सुटणार आहे का? यापूर्वी चार गावांतून तक्रारी आलेल्या ग्रामसेवकाची बदली करून पाचव्या गावाचेही नुकसान करायचे का?” असा सवाल करण्यात आला.
दरम्यान, रात्री उशिरा सील उघडण्याच्या निर्णयाबाबत विस्तार अधिकाऱ्यांनी हा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली दिली. रात्री उशिरा जाऊन सील उघडण्याऐवजी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन सील उघडता आले असते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. प्रशासनाने संबंधित ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका सरपंच संघटनेने मांडली. ग्रामसेवकाकडील सर्व चार्ज काढून घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यालयात बसवावे, संपूर्ण चौकशी करून दोष आढळल्यास तात्काळ निलंबन करावे आणि कारवाईअंती त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवावे, अशा मागण्या संघटनेने केल्या.
या मागण्यांना बीडीओंनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित ग्रामसेवकाकडून सर्व ग्रामपंचायतींचे चार्ज काढून घेण्यात येतील आणि त्यांचा चौकशी अहवाल लवकरात लवकर जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सरपंच संघटनेने सांगितले.
ग्रामसेवकाने ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रामसभांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी बीडीओ कार्यालयाने तातडीने सचिवांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामसेवकांच्या प्रकरणात सरपंच संघटना संवेदनशील असून प्रशासनाने योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य विकास चोथे उपस्थित होते. सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी सरदेसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, संघटनेचे नेते संतोष बेलवाडे, अमोल बांबरे, तालुका अध्यक्ष तथा मडिलगेचे सरपंच बापू निऊंगरे, महिला अध्यक्षा तथा कानोलीच्या सरपंच सुषमा पाटील, सोहाळेच्या सरपंच भारती डेळेकर, हाजगोळी बु.च्या सरपंच सविता जाधव, सुळेरानचे सरपंच शशिकांत कांबळे, देवर्डेच्या सरपंच सौ. कल्पना चाळके, हाजगोळी खुर्दचे उपसरपंच प्रशांत कोटकर, वसंत चाळके, डॉ. जाधव यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट.

🟡 दरम्यान जि. प. सदस्य शिरीष देसाई यांच्या मध्यस्थी ने अखेर हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत ऑफिस चे सील 6 दिवसानी उघडले. सील उघडून दप्तरं तपासणी व पंचनामे करुन पुन्हा सील करायचे काम उशीर पर्यंत सुरु होते. विकास अधिकारी सुभाष सावंत यांच्या आदेशाने विस्तार अधिकारी श्री कुंभार यांनी दप्तरं सील करण्यासाठी पंचनामे केले या प्रक्रियेनंतर ग्रामसेवक श्री. येळने यांची तडकाफडकी बदली केली असल्याचे समजते. डॉ. सुधाकर जाधव डॉ.रोहन जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑आजरा महाविद्यालयात ‘इंग्लिश-वीक’ उत्साहात; विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण.

आजरा : प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘इंग्लिश-वीक’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
“इंग्रजी भाषा ही आजच्या युगात भीतीदायक वाटत असली तरी तिच्याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेपासून दूर जाण्याऐवजी तिचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी केले.
या उपक्रमात वर्ड चेन, पॅरा रायटिंग, रीडिंग, स्पेल-बी, हँड रायटिंग आणि इंग्लिश साँग सिंगिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, अधीक्षक योगेश पाटील व पर्यवेक्षक मनोज पाटील उपस्थित होते. सहसमन्वयक डॉ. सलमा अत्तार यांनी प्रास्ताविक केले, तर समन्वयक प्रा. रमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
विविध स्पर्धांमध्ये तन्वी येसादे, संचिता राणे, आयेशा किल्लेदार, प्रतीक्षा घुरे, रूमन माणगावकर, वैष्णवी कांबळे, वेदिका तेजम, तेजल कांबळे, अर्थव मोहिते, शिवम केसकरकर, मानसी बुडके, अनुष्का आळवणे, सालेहा दरवाजाकर, मसिरा नाईकवाडे, आदिती चव्हाण, धैर्यशील काणेकर, सानिया मुजावर, अकमल लमदुरे, सुधी पाटील, समृद्धी गायकवाड, दीप्ती राऊत व समर्थ पांगम यांनी यश मिळविले.
विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अर्थव मोहिते, मसिरा नाईकवाडे व मानसी बुडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. रणजीत भावदनकर, विठ्ठल हाके, स्वाती देसाई, वैशाली देसाई, सुवर्णा धामणेकर, डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. शेखर शिऊडकर यांनी आभार मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.