मडिलगे शेतीवाडीवर बिबट्या व वन्यजीवांचा वाढता वावर; ग्रामपंचायतीकडून वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
आजरा : प्रतिनिधी.
मडिलगे ( ता. आजरा ) शेती परिसरात व गावालगत गेल्या काही दिवसांपासून बिबट्या व वन्यजीवांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थ वतीने वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची निवेदनाने मागणी केली आहे.
याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आजरा वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बिबट्या व वन्यजीवांचा वावर मानवी वस्तीजवळ तसेच शेत परिसरात आढळून येत असल्याने भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा व प्रत्यक्ष पथक तैनात करावे, बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. तसेच गाव व शेत परिसरात वनविभागाची नियमित गस्त वाढवावी, बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी ग्रामस्थांना सूचना देऊन जनजागृती करावी, शाळकरी मुले, महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
वन्यजीवांमुळे कोणाचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. परिस्थिती गंभीर असल्यास वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मडिलगे ग्रामपंचायतीचे सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच के. व्ही. येसणे, शिवाजी गुरव, गणपतराव आरळगुंडकर, आनंदा घंट्टे, अभिजीत मोहिते, अनिकेत कवळेकर, प्रकाश कडगावकर, विश्वजीत मुंज, सचिन कातकर, संदीप पाटील, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




