🟣गवसे येथे कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.
🛑आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिन साजरा.
🟣गवसे येथे कॅन्सर तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी

गवसे ता. आजरा येथे दि. १९ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी अंतर्गत गवसे येथे कॅन्सरचे, निदान, जनजागृती व आवश्यक मार्गदर्शनासाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.
शिबिराचे उद्घाटन उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई तसेच गवसे सरपंच सौ. रेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देशमाने व दंतचिकित्सक डॉ. जिरगे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, आजरा डॉ. सुधाकर जाधव, वैद्यकीय अधिकारी, वाटंगी डॉ. आर. जी. गुरव व डॉ. एम. ए. शेख यांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये एकूण ३६ रुग्णांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. तसेच मुख, स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच संशयित रुग्णांनी पुढील तपासणी व उपचारासाठी वेळेत संदर्भ सेवा घेण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रस्ताविक अतुल पाथरवट यांनी केले तर आभार श्रीमती गीतांजली सुतार यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गवसे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचे सर्व कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देत लवकर निदान व वेळेवर उपचारासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.
🛑आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिन साजरा
आजरा : – प्रतिनिधी

जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे १९ ऑगस्ट रोजी दीनदयाळ महाविद्यालयाच्या हॉलमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीनदयाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजीव देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. आजरा तालुक्यातील ज्येष्ठ फोटोग्राफर बी. टी. सुतार यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य संजीव देसाई म्हणाले, “माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कायमस्वरूपी जतन करण्यामध्ये फोटोग्राफरचा मोठा वाटा आहे. छायाचित्रांमुळे आयुष्यातील सुंदर आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो.”
ज्येष्ठ फोटोग्राफर बी. टी. सुतार यांनी आपल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीच्या आठवणींना उजाळा दिला. “रंगीत फोटोग्राफी आली आणि फोटोंच्या गालावर लाली चढली. फोटोग्राफरच्या मनात एक स्पार्क असला पाहिजे; तरच छायाचित्रे बोलकी होऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले. जुन्या काळातील फोटोग्राफी, लाईट्स आणि विविध तंत्रांमधील गमती-जमती त्यांनी यावेळी सांगितल्या. फोटोग्राफी क्षेत्रातील बदल, पारंपरिक छायाचित्रणापासून डिजिटल युगापर्यंतचा प्रवास आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची गरज यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमास आजरा तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, शामराव पाटील, श्रीकांत देसाई, राकेश करमळकर, श्रावण चव्हाण, जतीन नार्वेकर, आदिल मुल्ला, किरण चव्हाण, विक्रांत वाळके, रोहन गुरव, साईनाथ नांदवडेकर, विनोद कुंभार, दिनेश कालेकर, निखिल कळेकर, सलीम तकीलदार यांच्यासह तालुक्यातील फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षणांना आठवणींचे रूप देणाऱ्या फोटोग्राफर बांधवांच्या योगदानाचा गौरव करत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
