वन्यजीव सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन; प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राची पाहणी व AI प्रणालीबाबत कार्यशाळा.
आजरा.- प्रतिनिधी.
वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दि. ०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ यांच्या शुभहस्ते, तसेच मा. श्री. विलास काळे, (सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर) व श्री. सचिन सावंत, (परीक्षेत्र वन अधिकारी, आजरा) यांच्या प्रमुख उपस्थितीत वनपरीक्षेत्र कार्यालय आजरा, (सुलगाव) येथे पार पडले.
यावेळी कृष्णा डेळेकर, (वनपाल उत्तर आजरा), संदीप शिंदे, (वनपाल दक्षिण आजरा), श्रीमती कविता सावंत (वनपाल धनगरमोळा), श्रीमती संगीता राठोड, (वनरक्षक आजरा), श्रीमती प्रियांका पाटील (वनरक्षक मडीलगे), श्रीमती सरिता बावस्कर (वनरक्षक साळगाव), संग्राम खापरे, (लेखापाल आजरा) तसेच वनपरीक्षेत्र आजरा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वनविभाग, आजरा यांच्या वतीने सप्ताहाच्या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राची पाहणी.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी मौजे घाटकरवाडी येथील प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राची पाहणी केली. यावेळी प्रस्तावित केंद्रामध्ये करण्यात येणाऱ्या विविध कामांची माहिती घेण्यात आली. यावेळी श्री. धैर्यशील पाटील, (उपवनसंरक्षक, कोल्हापूर), AI तज्ज्ञ सौरव मोईत्रा, मा. श्री. विलास काळे, (सहाय्यक वनसंरक्षक कोल्हापूर), सचिन सावंत, (परीक्षेत्र वन अधिकारी) आजरा व श्रीमती कविता सावंत (वनपाल धनगरमोळा) उपस्थित होते.

हत्तींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी प्रस्तावित केंद्र व परिसरात AI आधारित कॅमेरे आणि AI ड्रोन प्रणाली वापरण्यात येणार आहे. हत्ती गावालगत आल्यास त्याची माहिती गावातील ग्रामसंस्कार वाहिनी तसेच वनविभागाच्या नियंत्रण कक्षास मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे हत्तीमुळे नुकसान होण्यापूर्वीच संबंधित पथकास हत्तीच्या ठिकाणी पोहोचून आवश्यक कार्यवाही करता येईल आणि हत्तीला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने स्थिरावण्यास मदत होईल, अशी माहिती उपवनसंरक्षक श्री. धैर्यशील पाटील यांनी दिली.
जलद कृती दल व हत्ती हाकारा गटासाठी AI प्रणालीबाबत कार्यशाळा.
यानंतर वनपरीक्षेत्र आजरा, चंदगड व पाटणे येथील जलद कृती दल तसेच हत्ती हाकारा गटातील सदस्यांसाठी AI आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणाली व वन्यजीव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व AI तज्ज्ञ सौरभ मोईत्रा यांनी AI प्रणालीचा वन्यजीवांच्या हालचालींचे निरीक्षण, वेळेवर माहिती मिळविणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी होणारा उपयोग याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तसेच उपस्थित कर्मचारी व पथक सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अडचणी व अनुभव जाणून घेण्यात आले.
वन्यजीव संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाच्या वतीने करण्यात येणारे हे प्रयत्न वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
