🛑अपात्रतेमुळे सभापतीपदासाठी फेरनिवड ३० जुलैला; स्थगिती मिळाल्यास प्रक्रिया थांबणार.
🛑 संकेश्वर-वांदा महामार्गावरील अंतर कमी, एसटी भाडेही कमी करा.( शिवसेना उबाठा गटाची परिवहन विभागाकडे मागणी.)
🛑 अपात्रतेमुळे सभापतीपदासाठी फेरनिवड ३० जुलैला; स्थगिती मिळाल्यास प्रक्रिया थांबणार.
आजरा .- प्रतिनिधी
आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाद मागितली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
सभापती अपात्र ठरल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ३० जुलै रोजी सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या नोटिसा काही सदस्यांना प्राप्त झाल्याने तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सभापतीपद हे महिला मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातून दोन महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यापैकी सौ. जयश्री गाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता उपसभापती सौ. यशोदा पोवार या संभाव्य दावेदार मानल्या जात आहेत. मात्र त्यांच्या मागास प्रवर्गाच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने त्या सभापतीपदासाठी पात्र ठरतील की नाही, याबाबत उत्सुकता आहे. आवश्यक वैधता प्रमाणपत्र नसल्यास हे पद काही काळ रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, न्यायालयाकडून ३० जुलैपूर्वी स्थगिती मिळाल्यास फेरनिवड प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचे पुढे काय परिणाम होतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींना आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे.
सौ. – जयश्री संजय गाडे.
पुढचा लढा लढणारच प्रोसेस चालू आहे. ३० तारखेला सभेचे आयोजन असले तरीही आम्हाला २८ तारखेपर्यंत स्थगिती ऑर्डर मिळेल न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
🛑 संकेश्वर-वांदा महामार्गावरील अंतर कमी, एसटी भाडेही कमी करा.( शिवसेना उबाठा गटाची परिवहन विभागाकडे मागणी.)
आजरा – प्रतिनिधी.

संकेश्वर-वांदा हा महामार्ग आजरा तालुक्यातून जातो. या मार्गावरील अनेक वळणे काढल्यामुळे रस्त्याचे अंतर लक्षणीयरित्या कमी झाले आहे. त्यामुळे आजरा – गडहिंग्लज तसेच आजरा ते आंबोलीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या स्टेजही कमी झाल्या आहेत. मात्र तरीही प्रवाशांकडून जुन्या अंतरानुसारच एसटीचे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांवर अनावश्यक आर्थिक भार पडत आहे.
म्हणून आपल्या विभागामार्फत सर्वे करून स्टेज कमी झालेल्या बस फेऱ्यांचे तिकीट दर कमी करावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “रस्ता सुधारल्याने प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही कमी झाले आहे. त्याचा फायदा थेट प्रवाशांना मिळाला पाहिजे. तिकीट दर कमी केल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.”
यावेळी सदर निवेदन शिवसेना उप जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी दिनेश कांबळे, समीर चांद, महेश पाटील, अमित गुरव, पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




