🟣आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा निषेध! डॉक्टर्स व परिचारकांना सुरक्षा कायद्याची मागणी.
🟣वाणी डेफ चिल्ड्रन्स फाउंडेशन – नवजात बालकांच्या श्रवण तपासणी व पुनर्वसन उपक्रम.( आजरा तालुक्यात उपक्रमाला होणार सुरुवात.- लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.- )
🟣आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा निषेध! डॉक्टर्स व परिचारकांना सुरक्षा कायद्याची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लज्जास्पद शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली.
या घटनेचा जनआरोग्य संघर्ष समिती आजरा यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दि.३० रोजी समितीने आजरा तहसीलदार, तहसील कार्यालय आजरा यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही बाब अत्यंत निंदनीय व निषेधार्ह असून, त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
या घटनेमुळे डॉक्टर्स, परिचारकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे.
या निवेदनातील मागण्या:
- महाराष्ट्र शासनाने आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
- आरोग्य कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण रोखण्यासाठी स्वतंत्र दखलपात्र व जामीनपात्र कायदा आणावा.
- अधिवेशनात यासंदर्भात ठराव मांडून कायदा लागू करावा.
- वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावे.
वरील मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई, शांताराम पाटील, रवींद्र भाटले, प्रकाश मोरस्कर, अंबाजी सुतार, मन्नपा भोसले सह पदाधिकारी यांच्यासह आहेत.
🟣वाणी डेफ चिल्ड्रन्स फाउंडेशन – नवजात बालकांच्या श्रवण तपासणी व पुनर्वसन उपक्रम.( आजरा तालुक्यात उपक्रमाला होणार सुरुवात.- लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.- )
आजरा – प्रतिनिधी

वाणी डेफ चिल्ड्रन्स फाउंडेशनतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ग्रामीण रुग्णालय येथे दर गुरुवारी नवजात बालकांची मोफत कान (श्रवण) तपासणी केली जाते.
सदर योजना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व वाणी फाउंडेशन यांच्या सहकार्यातून अबोध असलेल्या योजनेचे लाभार्थी यांनी लाभ घ्यावे व यासाठी माता-पालक यांनी आपल्या पाल्यांसाठी याबाबतची तपासणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे.
याबाबत आज दिनांक १० सदर फाॅऊडशेन कर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांना भेट देऊन माहिती दिली.
सदर तपासणी दरम्यान एखाद्या नवजात बालकामध्ये श्रवणदोष आढळल्यास, त्या बालकाला आवश्यकतेनुसार मोफत श्रवणयंत्र, संभाषण व भाषा विकास प्रशिक्षण (Speech & Language Therapy) तसेच पुढील मार्गदर्शन व पुनर्वसन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवजात बालकांमधील श्रवणदोष लवकर ओळखून वेळेवर उपचार व पुनर्वसन उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे बालकांचा भाषा विकास योग्य वेळी होतो, ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतात आणि भविष्यात सक्षम नागरिक म्हणून घडतात. या माध्यमातून आजरा तालुका कर्णबधिरमुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
सद्या महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये संस्थेचे कार्य सुरू असून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आणि आजरा ग्रामीण रुग्णालय येथे नवजात श्रवण तपासणीचा उपक्रम नियमितपणे राबविला जात आहे.
वाणी डेफ चिल्ड्रन्स फाउंडेशन सन 2005 पासून भारतातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असून महाराष्ट्र, कर्नाटक, मिझोराम आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये नवजात श्रवण तपासणी, लवकर हस्तक्षेप आणि पुनर्वसन क्षेत्रात कार्य करत आहे.
संस्थेचे ध्येय म्हणजे श्रवणदोष असलेल्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना योग्य आरोग्य सेवा, शिक्षण, पुनर्वसन, संवाद कौशल्य विकास आणि समान संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येक बालक सक्षम व आत्मनिर्भर जीवन जगू शकेल.
