पावसाची शक्यता.- राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता.- पहा हवामान अंदाज.
पुणेः- प्रतिनिधी.
एकीकडे देशभरात एल निनोमुळे धास्ती वाढली असतानाच आता मान्सूनबाबतची अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ जून ते २ जुलै या काळात महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय होऊ शकतो. या काळात कोकणसह राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून काही भागांमध्ये २४ ते ४८ तासांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानुसार, १४ जून रोजी नैऋत्य १ मान्सूनची उत्तर मर्यादा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारिपाडा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर मार्गे पुढे सरकलेली असल्याची माहिती समोर आली आहे.
तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार-पाच दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार व दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
प्रशांत महासागरात अतिशय तीव्र ‘एल निनो’ सक्रिय झाला असून, तो 1950 नंतरचा सर्वात भीषण ठरण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान संस्थेने वर्तवली आहे. याचा थेट व विपरीत परिणाम भारतातील आणि महाराष्ट्रातील मान्सूनवर होत असून, पावसाचे प्रमाण कमी होणे व दुष्काळाचे सावट वाढण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवाहात अडथळे येत आहेत. मान्सून महाराष्ट्रात वेळेवर पुढे सरकण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने एल निनो सक्रिय झाल्याला दुजोरा दिला आहे. यंदा देशात सरासरीच्या सुमारे 90 टक्के इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’चा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
