तिलारी घाटातील अनोळखी महिलेच्या खुनाचा गुंता उलगडला.
( पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासातून 3 आरोपींना अटक; एसपी नीलोत्पल यांनी तपास पथकाला 50 हजारांचे बक्षीस जाहीर.)
कोल्हापूर, प्रतिनिधी.
तिलारी घाटात बेवारस स्थितीत सापडलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. 29 मे 2026 रोजी सकाळी तिलारी घाटात कोडाळी गावच्या हद्दीत एका 30 ते 35 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. अज्ञात आरोपींविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तपासाचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळावरील फोटो, कपडे, दागिने यावरून कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कर्नाटक व गोवा राज्यातील 30-35 वयोगटातील बेपत्ता महिलांची माहिती गोळा केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तपासादरम्यान दि. 25 मे 2026 रोजी तिलारी घाटात एक संशयास्पद कुझर गाडी 20 मिनिटांत घाटातून परत वर येताना दिसली. त्याच गाडीचा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. पुढे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत महिला पल्सर मोटरसायकलवरून संशयित आरोपीसोबत जाताना दिसली. बेळगाव ते हुबळी दरम्यान 110 किमी अंतरातील फुटेज तपासून आरोपीचे नाव बसवराज येलाप्पा करणावर, रा. राजकट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव असे निष्पन्न झाले.
गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सागर वाघ व शेष मोरे यांच्या पथकाने शिनोळी, ता. चंदगड येथे सापळा रचून 1) यल्लाप्पा करणावर (57), 2) बसवराज करणावर (33), 3) लगमाप्पा अंकलगी (37) या तिघांना पल्सर मोटरसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मयत महिला गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (25, रा. वंटमोरी, जि. बेळगाव) हिला तिलारी घाटात नेऊन खून केल्याची कबुली दिली. आरोपी व जप्त मोटरसायकल पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
चौकट : तपास पथकाचा गौरव
या गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपास पथकाला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले. या पथकात पो.नि. सुशांत चव्हाण, निंगाप्पा चौखंडे, सपोनि सागर वाघ, पोउपनि विजय कोळेकर, शेष मोरे, पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, विजय इंगळे, समीर कांबळे, संजय कुंभार, तुकाराम राजीगरे, अमित सर्जे, युवराज पाटील, अनिल जाधव, अरुण धनगर, सागर चौगले, आनंदा नाईक, राम पाटील, सुशिल पाटील यांचा समावेश होता.
