एरंडोळ येथे पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
एरंडोळ ता.आजरा येथे कोकण विकास सोसायटी, पणजी, सामाजिक संवेदना संस्था, आजरा आणि ग्रामपंचायत एरंडोळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि २९ रोजी WeLead अंतर्गत एरंडोळ येथे पंचायत राज नेतृत्व विकास कार्यक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एरंडोळ, पारपोली, पेरणोली, गवसे, हाळोली आणि कानोली गावांतील ग्रामपंचायत प्रतिनिधी व महिला नेतृत्वाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास उपस्थित मुख्य वक्त्या लता पाकले, सामाजिक संवेदना संस्थेचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई, कोकण विकास सोसायटीचे समन्वयक राजेंद्र कांबळे तसेच विविध गावांतील सरपंच व सदस्य यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उद्देश स्पष्ट करताना राजेंद्र कांबळे यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांच्या नेतृत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटन सत्रात बोलताना सभापती जयश्री गाडे यांनी पंचायत राज प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामकारभाराची सखोल माहिती मिळेल आणि महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपसभापती यशोदा पोवार यांनी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग हेच कार्यक्रमाचे यश असल्याचे सांगितले.
मुख्य वक्त्या लता पाकले यांनी पंचायत राज व्यवस्थेतील अधिकार, कर्तव्ये, ग्रामपंचायत प्रशासन, निधी नियोजन, ग्रामविकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पर्यावरणपूरक विकास याविषयी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी काही महिला सदस्यांनी व्यासपीठावर येऊन प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय समारोपात कॉ. संपत देसाई यांनी “WeLead” या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करताना सामूहिक नेतृत्व, सहभाग आणि कृती यावर भर दिला. महिलांनीच समाज आणि कुटुंबव्यवस्थेला आधार दिला असून आज त्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामविकासाचे नेतृत्व महिलांच्या हाती आले असून त्या सक्षमपणे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी एरंडोळचे उपसरपंच भीमराव माधव यांनी उपस्थित सर्व महिला सरपंच, सदस्य, नेतृत्त्ववान महिला आणि मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
