सिंधुदुर्ग. प्रतिनिधी.२९.
नारायण राणेंना भाजपाकडून केंद्रीयमंत्री पद दिल्या गेल्याने, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर या वादात अधिकच भर पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एक मोठा खुलासा केल्याचं दिसून आलं आहे.
नारायण राणेंनी म्हटलं की, “माझा वैयक्तिक राग अजिबात नाही आणि मी बाळासाहेबांना तेव्हाच शब्द दिला होता की, माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. याची मी खबरदारी घेईन, तुम्ही काळजी करू नका. हा माझा त्यांनी शब्द घेतला.” असं त्यांनी सांगितलं आहे.
राणे पुढे म्हणाले की , “पण आता हे उठसूठ नारायण राणे… नारायण राणे बोलत आहेत.व विनाकारण आरोप करतायेत? तर माझं देखील वृत्तपत्र आहे आणि लवकरच चॅनल देखील येईल. मग आम्ही सकाळ संध्याकाळ दाखवतो, लोकं काय म्हणणार की यांना चांगलं काही दाखवता येत नाही. राज्यातील, देशातील काही प्रश्न नाही दाखवता येत, सांगता येत. नुसतं एकाच्याच विरोधात लागणं. अरे पण मी तुमचं काय घेऊन आलेलो नाही. मी माझ्या कर्तृत्वाने जे काय घडलो आहे, त्यात तुम्हाला काय राग?. तुम्हाला उलट वाटलं पाहिजे की या माणसाने शिवसेनेसाठी फार केलेलं आहे. असं का वाटत नाही.” असंही यापुढे बोलताना नारायण राणेंनी बोलून दाखवलं आहे.
