कणकवली. प्रतिनिधी.२८.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
नारायण राणे कणकवलीमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला असलेल्या रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाराज्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर राणे तिथून निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
यावेळी नारायण राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार करंट लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी करंट लागत असल्याचं सांगत सावध केलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर राणेंनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, व्हिडीओमध्ये राणेंना जोराचा करंट लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
