स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी ४६ लाख ढोबळ नफा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या पतसंस्थेने सन २०२५ २०२६ सालात रू. ३४९ कोटी ५० लाख ५३ हजार ६४० इतका एकूण व्यवसाय केला आहे. संस्थेला ४ कोटी ४६ लाख ८८ हजार ७०० इतका ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या तरतुदी करून रू. १ कोटी २५ लाख २५ हजार ९९० इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी दिली. सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेच्या स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेकडे वसुल भागभांडवल रू. ४ कोटी ५८ लाख इतके असून आर्थिक वर्षात एकूण रू. १९२ कोटी ८८ लाख ठेवी, रू. १५६ कोटी ७२ लाख कर्जवाटप, रू. ५८ कोटी ५९ लाख गुंतवणूक, संस्थेचा राखीव व इतर निधी रू. २१ कोटी पेक्षा अधिक आहे. ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना जलद व ऑनलाईन सेवा देणेसाठी संस्था लवकरच कोअर बँकिंग सिस्टीम लागू करत आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणारे संस्थेचे सन्माननिय सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी संस्थेच्या वाढ व विकासासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी व्हा. चेअरमन सुधीर कुंभार, संचालक नारायण सावंत, रविंद्र दामले, रणजित पाटील, शिवाजी येसणे, गणपत जाधव, सुधीर चोडणकर, विश्वजित मुंज, राजेंद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, संचालिका सौ. सुनिता सुरेश कुंभार, सौ. सारिका देसाई, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार त्याचबरोबर संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



