विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा.- ( अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.)
कोल्हापूर (प्रतिनिधी)
राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण विचारात घेऊन, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समुपदेशक (Counselor) नियुक्त करणे अनिवार्य करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.
विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत:
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये शैक्षणिक ओझे, करिअरची अनिश्चितता आणि मानसिक तणावामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात आहेत. मनमोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठ न मिळाल्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही केवळ त्या कुटुंबाची नव्हे, तर समाजाची आणि राष्ट्राची मोठी हानी आहे.
प्रमुख मागण्या – १. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये कायमस्वरूपी ‘मानसोपचार तज्ज्ञ’ किंवा ‘समुपदेशक’ (Counselors) यांची नेमणूक करणे अनिवार्य करावे २) विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात ‘मेंटल हेल्थ’ सेशनचे आयोजन करण्यात यावे ३) शैक्षणिक संस्थांमध्ये गोपनीय हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी आपली समस्या मोकळेपणाने मांडू शकतील ४) शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, संकटांशी लढण्याचे मानसिक बळ देणे ही काळाची गरज आहे. तरी प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने अंमलबजावणी करावी
अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेने केली.
यावेळी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, सचिव धनंजय गायकवाड, सरचिटणीस सूर्यभान इंगळे, शहराध्यक्ष विराज पाटील, आदित्य पाटील, हर्षवर्धन शिंदे, सार्थक पाटील, ओंकार शिंदे, सिद्धार्थ यादव, अथर्व शिंदे, हर्षवर्धन पाटील, अभिजित देसाई, गौरव आवटे, अखिलेश गवळी, सुमित कांबळे, चिन्मय जोशी आदी उपस्थित होते.


![बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्ताने – यावर्षीचे वारकरी कीर्तन संमेलन.[ दि २५ रोजी – भैरवनाथ मंदिर शेळप ता. आजरा येथे ] ( समस्त वारकरी संप्रदाय ता. आजरा. )](https://sahyadrinewsmarathi.com/wp-content/uploads/2026/04/IMG_20260421_225417-265x198.webp)

