Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने कोल्हापुरात संताप.- मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना...

इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने कोल्हापुरात संताप.- मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.🟣भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण.( वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती.)🟣गडहिंग्लज येथील ओमकार महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीमध्ये उल्लेखनीय यश.

Oplus_131072

🟣इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने कोल्हापुरात संताप; मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
🟣भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण.
( वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती.)
🟣गडहिंग्लज येथील ओमकार महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीमध्ये उल्लेखनीय यश.

🟣इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने कोल्हापुरात संताप; मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कोल्हापूर (प्रतिनिधी).

NCERT च्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तार दर्शविणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी गुरव यांना निवेदन देण्यात आले. या ऐतिहासिक घोडचुकीची गंभीर दखल घेऊन हा नकाशा तात्काळ पूर्ववत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनातील माहितीनुसार, NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकातून पूर्वी असलेला मराठा साम्राज्याचा नकाशा नवीन आवृत्तीत जाणीवपूर्वक वगळण्यात आला आहे. या संदर्भात महासंघाने अनेक ऐतिहासिक पुरावे सादर केले आहेत. १७५२ च्या करारानंतर मुघल बादशहा मराठ्यांच्या संरक्षणाखाली आला होता आणि मुघलांचे मांडलिक असलेले अनेक राजपूत शासक अप्रत्यक्षपणे मराठा सत्तेखाली होते. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, मराठ्यांनी राजस्थानमधील प्रदेशातून ‘चौथाई’ व ‘सरदेशमुखी’ वसूल केली होती, जे त्यांच्या राजकीय अधिकाराचे प्रतीक आहे.
मराठा साम्राज्याचा नकाशा हा केवळ भौगोलिक सीमांचा नसून तो ‘प्रभावक्षेत्र’ (Sphere of Influence) दर्शवणारा आहे. त्यामुळे राजपुताना (राजस्थान) प्रदेश मराठा प्रभावक्षेत्रात दाखवणे हे ऐतिहासिकदृष्ट्या पूर्णपणे योग्य आणि आवश्यक आहे. विद्यार्थ्यांपर्यंत वस्तुनिष्ठ आणि पुराव्याधारित इतिहास पोहोचवण्यासाठी इतिहासतज्ज्ञांची समिती नेमून या प्रकरणाची शास्त्रीय पडताळणी करावी आणि दुरुस्त केलेला नकाशा पुन्हा पुस्तकात समाविष्ट करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष उदय देसाई, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, गुरुदास जाधव, सूर्यभान इंगळे, किशोर डवंग, अवधूत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

🟣भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत लोकशाहीर गव्हाणकर पुरस्काराचे वितरण.
( वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती.)

आजरा – प्रतिनिधी.

लोकशाहीर द ना गव्हाणकर पुरस्काराचे वितरण २ मे रोजी डॉ भालचंद्र कांगो यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनसो मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती पुरस्कार व स्मारक समितीच्या वतीने कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली. लोकशाहीर द. धना गव्हाणकर पुरस्कार समितीची बैठक झाली या बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे केंद्रीय नेते असून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विद्यार्थी दशेपासूनच डॉ. कांगो हे डाव्या चळवळीत सक्रिय राहिले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर डाव्या चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यांनी केला. आयुष्यभर कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी ते संघर्ष करीत आले आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय सचिव मंडळात घेत चार राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. डॉक्टर भालचंद्र कांगो हे ज्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत त्याच पक्षात लोकशाहीर गव्हाणकर यांनी आपले आयुष्य घालवले आहे. सातत्याने कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या लढयात ते अग्रभागी राहिले आहेत. आपल्या शाहिरीने कामगार कष्टकऱ्यांच्या वेदना दुःख मांडत त्यांच्या मुक्तीची गाणे शाहीर गात राहिले. एक अभ्यासू कॉम्रेड म्हणून त्यांची पक्षांमध्ये नोंद घेतली जात होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवण्यात आपले वैचारिक योगदान दिले आहे त्याचप्रमाणे भालचंद्र कांगो हेही कष्टकरी, कामगारांच्या लढ्याबरोबरच डाव्या चळवळीत तरुणांना घडवण्यात पुढाकारात राहिले आहेत. म्हणूनच त्यांच्या हस्ते हा पुरस्कार संभाजी भगत यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
लोकशाहीर गव्हाणकर हे महागोंड या गावचे असून वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात हे गाव येते. दोन वर्षांपूर्वी वाहरू सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करताना ना. हसन मुश्रीफ यांनी लोकशाहीर गव्हाणकरांच्या गावी उचित स्मारक उभा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे जाहीर केले होते. त्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय पुरस्कार समितीने घेतला आहे.
यावेळी जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, समितीचे सचिव सुनील पाटील, डॉ नवनाथ शिंदे, मीना मंगळूरकर, युवराज पवार, कॉम्रेड संजय तरडेकर, पुष्पलता घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाडगे, रणजित कालेकर, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकशाही द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार समिती नोंदणी करण्याचा निर्णय करण्यात आला.

🟣गडहिंग्लज येथील ओमकार महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीमध्ये उल्लेखनीय यश

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गडहिंग्लज येथील ओमकार महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप तसेच शिवाजी विद्यापीठ मेरिट स्कॉलरशिपमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप अंतर्गत रिद्धी आप्पासाहेब पाटील (B.A. 2), साहिल आनंदा चव्हाण (B.Com 3), विश्वजीत विजय राणे (B.A. 2), रोहित रवींद्र कांबळे (B.A. 2), सोहन शांताराम पाटील (B.A. 2), विद्या आनंदा चौगुले (B.A. 3) आणि आदित्य आत्मलिंग उंबरे (B.A. 1) या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
तसेच शिवाजी विद्यापीठ मेरिट स्कॉलरशिपमध्ये समीक्षा सुभाष पाटील (B.A. 2) आणि रिद्धी आप्पासाहेब पाटील (B.A. 2) यांना प्रत्येकी 5 हजार रुपये, तर अनिता विनायक पाटील, प्रियंका सागर पाटील, चंदना विठ्ठल गोरुले (B.A. 1) आणि सानिका संभाजी पसारे (B.Com 3) यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
या यशामुळे ओमकार महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून विद्यार्थ्यांच्या कष्ट आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित असल्याचे स्पष्ट होते. शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे संस्था, महाविद्यालय व शिष्यवृत्ती विभागाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.