सात घरफोड्या करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या.- ( आजरा तालुक्यातील दोन आरोपी. ) २० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त.- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांचे यश.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, चंदगड व दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग) येथील ७ घरफोड्या करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले.
रज्जाक अस्लम मुजावर (वय.२६, रा. नांद्रे, ता. मिरज, जि. सांगली ) ,तेजस तानाजी पाटील ( वय. २८, रा. कोरीवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) व विनायक सिताराम हरेर वय.३२ रा. हत्तीवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या कडून २० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यामध्ये घडत असलेले घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविणेबाबत सुचना दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून जिल्हयामध्ये घडलेले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा घडले ठिकाणची भौगोलीक परिस्थिती, गुन्हा करणेची पध्दत याची माहिती घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथके माहिती घेत असताना अज्ञात चोरटयाने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, चंदगड या तालुक्यामध्ये दिवसा बंद स्थितीत असणारी घरे लक्ष करुन त्या घरामध्ये चोऱ्या केलेचे निदर्शनास आले.तपास एकत्रित सुरु केला.

यातील आरोपी रज्जाक मुजावर हा व त्याचे साथीदारासह चोरलेले दागिने विक्री करणेकरीता उजळाईवाडी (ता. करवीर ) गांवचे हद्दीत येणार असल्याचे खबऱ्या कडून समजले. त्याआधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिराक्षक शेष मोरे यांचे पथकाने दि.२५ मार्च रोजी रझाक मुजावर व तेजस तानाजी पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून गडहिंग्लज व भुदरगड येथील चोरीस गेलेला २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे ३२.६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले.
रजाक याला ताब्यात घेवून पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला असता विनायक हरेर यांचे नांव निष्पन्न झाले. गेल्या तीन ते चार महिन्यापासून गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, चंदगड या तालुक्यामध्ये दिवसाचे वेळी घरफोडी-चोरीचे एकुण ७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्याकडून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २३० ग्रॅम चांदीचे दागिने, महींद्रा मॅक्स ट्रॅक्टर, तिन मोटारसायकली व इतर साहीत्य असा एकूण २० लाख ८५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. या आरोपींनी गडहिंग्लज, आजरा प्रत्येकी २, चंदगड व भुदरगड प्रत्येकी एक तसेच दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथे एकूण ७ ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ.बी.धिरजकुमार व आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार समीर कांबळे, राजू कोरे, सतिश जंगम, योगेश गोसावी, विशाल चौगले, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय देसाई, सतिश सुर्यवंशी, अनिल जाधव,सुशिल पाटील, महेश आंबी, अमित मर्दाने, संजय हुंबे, सचिन दुधाने, सुरेश राठोड यांनी केली आहे.
