🛑ऐरोलीत ELDERTHON 2026 “तू चाल पुढे” भव्य उत्साहात संपन्न — कोल्हापूरकर संस्था, डीआरएस फाउंडेशन व ‘We Before Me’चा प्रेरणादायी पुढाकार.
🛑बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा
ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप.
🟣ऐरोलीत ELDERTHON 2026 “तू चाल पुढे” भव्य उत्साहात संपन्न — कोल्हापूरकर संस्था, डीआरएस फाउंडेशन व ‘We Before Me’चा प्रेरणादायी पुढाकार.
नवी मुंबई.- प्रतिनिधी.

नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, श्री गणेशा डीआरएस फाउंडेशन आणि We Before Me यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ELDERTHON 2026 – “तू चाल पुढे” (वर्ष तिसरे) ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची ३ किमी चालण्याची स्पर्धा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी इच्छापूर्ती गणेश मंदिर, सेक्टर-१५, ऐरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, आनंद आणि सामाजिक सहभागाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने वरिष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आरोग्य जागृती, सकारात्मक ऊर्जा, शिस्तबद्ध आयोजन आणि परस्पर स्नेहभाव यांचा सुंदर संगम या वॉकथॉनमध्ये अनुभवायला मिळाला. समाजातील ज्येष्ठांविषयी कृतज्ञता व्यक्त करत “सक्रिय रहा, निरोगी रहा” हा प्रभावी संदेश या माध्यमातून देण्यात आला.
स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला टी-शर्ट, टोपी, मेडल व नाश्ता देण्यात आला. तसेच विजेत्याना काही आकर्षक पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आमदार शिवाजीराव पाटील (चंदगड विधानसभा) हे प्रमुख उपस्थित राहणार होते. मात्र काही वैद्यकीय कारणास्तव ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. पण तरीही त्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत या उपक्रमास आपला मनापासून पाठिंबा दर्शविला.
तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, बीएमसीचे मुख्य अभियंता चंद्रकांत उंडगे, ऐरोली येथील विद्यमान नगरसेवक अशोक पाटील, शिवाजी खोपडे, अंकुश सोनावणे, कु. ऐश्वर्या सोनवणे, समाजसेवक सुदर्शन जिरगे, निलेश बाणखेले (उपशहर प्रमुख, मनसे) राजू पाटील, अनिल नकते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या भव्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डी. एल. भादवणकर, कार्याध्यक्ष विशाल पाटील, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील, तसेच धनाजी जाधव, नामदेव कुंभार, अभिजीत पुजारी, मनोहर पाटील, संदीप पाटील, उत्तम भादवणकर, तानाजी मिसाळ, संदीप भिंबर, सुहास शिंदे, मारुती हातकर तसेच महिलांमध्ये सौ. सुषमा भादवणकर, सौ. प्रतिभा तेजम, सौ. गीतांजली माने, सौ. मिनल गावकर, सौ. शोभा भादवणकर, सौ. जयू कामे, सौ. राजेश्री मोरे, सौ. साधना निकम आणि सर्व सल्लागार व सक्रिय सभासदांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट, शिस्तबद्ध व प्रभावी नियोजन सौरभ केडिया यांनी केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष डी. एल. भादवणकर यांनी सर्व स्पर्धक आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध सहकार्य आणि निःस्वार्थ सेवेमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आणि भविष्यातही अशाच एकजुटीने सामाजिक कार्य करत राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था वर्षभर विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून कोल्हापूरची संस्कृती व परंपरा जपत समाजहिताचे कार्य सातत्याने करत आहे. श्री गणेशा डीआरएस फाउंडेशन व We Before Me यांच्या सहकार्यामुळे ELDERTHON हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता समाजासाठी प्रेरणादायी चळवळ ठरला आहे.
या भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाबद्दल स्पर्धक व नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
🛑बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा
ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप
आजरा : – प्रतिनिधी.

बहिरेवाडी ( ता. आजरा ) येथील हभप आप्पा लक्ष्मण मोरे व सौ. हौशाबाई मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न झाला. ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठाचे वाटप करणेत आले. ग्रंथतुलातील पुस्तकांची प्राथमिक विद्यामंदिर, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी व श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांना समारंभपूर्वक सुपूर्द करणेत आली. रुक्मिणी विठ्ठल मंदिरसाठी पंढरपूरचे हभप एकनाथ नामदास महाराज यांचेकडे मोरे कुटूंबियांच्यावतीने दोन समई प्रदान करण्यात आली. मोरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत आई-वडिलांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. असे गौरवोद्गार पंढरपूरचे हभप एकनाथ महाराज यांनी काढले. मोरे दाम्पत्यांचा सहजीवनाचा अमृत महोत्सव व हभप आप्पा मोरे यांचा ९१ वा वाढदिवस असा संयुक्त सोहळा रुक्मिणी विठ्ठल मंदिर बहिरवाडी येथे घेण्यात आला. मोरे कुटुंबीयांच्या वतीने पाद्यपूजन, ९१ आरतीची ओवाळणी, मंदिरासाठी दोन समई भेट व सार्थ हरिपाठाचे वाटप व महाप्रसाद देणेत आला. हभप एकनाथ महाराज यांच्या हस्ते हभप आप्पा मोरे व सौ हौशाबाई मोरे यांचा कपडे, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. वयाची ९१ वर्षे व सहजीवनाचा अमृत महोत्सव सोहळा हा दुर्मिळ योग असून या निमित्ताने मोरे कुटुंबीयांनी केलेले सामाजिक योगदान वारकरी संप्रदायाला प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्गार हभप एकनाथ महाराज यांनी काढले.
यावेळी रुक्मिणी विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने झालेल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक हभप श्री. नानासो यादव, सदाशिव पिटके, बंडोपंत चौगुले, राजाराम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, जयवंत शिंत्रे, गजानन मिरजकर,कल्लाप्पा मिरजकर, सावळाप्पा मिसाळ, अर्जुन कुंभार, सुरेश पाटील, विजय काकडे,सदाशिव शिंत्रे यासह वारकरी व मोरे कुटूंबिय उपस्थित होते.
