मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे – डॉ. अशोक बाचुळकर.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अशोक बाचुळकर यांनी नुकतेच येथे केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डॉ. बाचुळकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. रणजित पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
डॉ. बाचुळकर पुढे म्हणाले की, मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सव, लोककला आणि खाद्यसंस्कृती या सर्वांचे मूळ मराठी भाषेतच आहे. भाषेमुळेच आपण आपल्या परंपरांशी जोडले गेलो आहोत. आज मराठी भाषा केवळ घरापुरती मर्यादित नसून ती प्रशासन, न्यायालय आणि शिक्षणाची भाषा म्हणूनही विकसित होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या भाषेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यामुळे संशोधनाला आणि भाषेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रा. विनायक चव्हाण, डॉ. एम. बी. जाधव, डॉ. सुनील पाटील आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासो बुडके यांनी तर मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
