राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजच्या काळातही तरुणांना दिशादर्शक – प्रा. जिज्ञासा उफराटे.
आजरा – प्रतिनिधी.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या काळात तरुणांमध्ये चेतना निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य आजच्या काळातही तरुणांना दिशादर्शक असे आहे, असे मत प्रा. जिज्ञासा उफराटे यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच प्रा. जिज्ञासा उफराटे यांनी मनोगत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या पहिल्या संकल्पक, कुशल प्रशासक आणि नीतिमान मार्गदर्शक होत्या. तर तरुणांना स्वधर्माचा खरा अर्थ समजावून देऊन युवा शक्ती हीच राष्ट्र उद्धारातील महत्वाची शक्ती असल्याचे मत प्रा. उफराटे यांनी व्यक्त केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले, प्रा. रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विनायक चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
