आजरा नगरपंचायत.- पूजा अश्विन डोंगरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट प्रणित ताराराणी आघाडीला नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदाच्या आठ जागा मिळाल्या. महाविकास आघाडी प्रणित आजरा शहर परिवर्तन विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या. अन्याय निवारण समितीला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एक जागा मिळाली. सोमवार दि.१२ रोजी उपनगराध्यक्ष निवड होती. अर्ज भरण्याच्या वेळेत ताराराणी आघाडीकडून पूजा डोंगरे तर अन्याय निवारण समितीकडून परशराम बामणे यांनी अर्ज दाखल केले होते. बामणे यांनी आपला अर्ज माघार घेतला त्यामुळे पूजा डोंगरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.तत्पूर्वी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे व प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, निवडणुका झाल्या, राजकारण संपले, आता आजरा शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन साऱ्यांनीच काम करूया. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांनी एकत्र राहून विकासाचे नियोजन करायला हवे. आगामी काळात शहरवासीयांना स्वच्छ, मुबलक व वेळेवर पाणी मिळावे यासाठी कटिबद्ध आहे. नूतन उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे म्हणाल्या, शहरातील समस्या जाणून घेऊन त्या निवारण करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. यावेळी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी सुरज सुर्वे, नगरपंचायत विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
