आजरा हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. ५ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कला-कार्यानुभव प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली.जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक विजयकुमार पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. एस. जी. पाटील व आजरा हायस्कूलच्या वाद्यवृंदाने स्वागतगीत सादर केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एल. तोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जी. डी. कांबळे यांनी करून दिला. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते ‘अमृत महोत्सव संविधानाचा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

श्रीमती एस. एस. कुराडे यांनी हस्तलिखिताची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व अंतरवर्गीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोकशाहीर रणजीत आशा अंबाजी कांबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात अनेक पोवाडे व समाज प्रबोधक स्फूर्ती गीते सादर केली. सर्व श्रोत्यांना खळखळून हसवत आधुनिक काळातील भक्केबाजपणा सोडून भारतीय संस्कृतीची कास विद्यार्थ्यांनी धरावी व स्वतःचा सर्वांगीण विकास करावा असे आव्हान विद्यार्थ्यांना केले . अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ.अनिल देशपांडे यांनी आधुनिक युगात शिक्षकांनी फक्त मार्गदर्शकाची भूमिका ठेवावी व विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक ,सल्लागार, माजी मुख्याध्यापक, विद्यमान मुख्याध्यापक ए .एल .तोडकर, उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस .कामत, पर्यवेक्षक ए. आर. व्हसस्कोटी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सौ. एच. एस. कामत यांनी उपस्थितांचे आभार मानले. सौ.टी एस. पाटील आणि सौ. एस. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
