मडिलगेमध्ये राजे बँक व राजे फौंडेशनच्यावतीने शनिवारी (ता.६) मोफत आरोग्य शिबिर.
उत्तूर, प्रतिनिधी.
मडिलगे (ता.आजरा) येथे शनिवारी (ता.६) मोफत आरोग्य शिबिर होणार आहे.शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त शंकरलिंग विद्या मंदिरमध्ये या शिबिराचे आयोजन केले आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेचे अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन व राजे बँकेच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात मोफत डोळे, हृदयविकार,अस्थिविकार,जनरल व मूत्रविकार तपासणी करण्यात येणार आहे. उच्च रक्तदाब, वारंवार छातीत दुखणे, धाप लागणे, अचानक घाम वा चक्कर येणे उलट्या होणे या हृदयाशी संबंधित विकारांची तपासणी केली जाईल. मूत्रविकाराशी संबंधित लघवीच्या तक्रारी, प्रोस्टेट, मुतखडा, मूत्राशयाचे व किडनीचे विकार इत्यादींची तपासणी होईल. डोळ्यांशी संबंधित डोळ्याची जळजळ,पाणी येणे, डोळ्यावर सारे येणे, मोतीबिंदू, दूरदृष्टी-निकट दृष्टी समस्या, डोळ्यांचा नंबर काढणे आदींची तपासणी केली जाईल. आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून दिले जातील.अस्थिविकारामध्ये गुडघे,कंबर व इतर हाडांचे दुखणे व झीज याबाबत तपासणी केली जाईल. जनरल तपासणीमध्ये सर्दी, ताप,खोकला, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी आदींची तपासणी करून मोफत औषधी देण्यात येतील.महिलांसाठी विविध पाच प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात येतील. मोतीबिंदू व डोळ्यावर सार असल्यास याबाबतच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. तसेच रक्तदाब, रक्तातील साखर,ईसीजी,अँजीओग्राफी यांची मोफत केली जाईल. २ डी इको व टीएमटी या तपासण्या सवलतीच्या दरात होतील. तपासणीनंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.तसेच विद्यार्थी रक्त गट तपासणीही करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर , प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण,मोरया हाॕस्पिटल कोल्हापूर,केदारी रेडेकर हाॕस्पिटल गडहिंग्लज व संकल्पसिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कागल यांचे तज्ञ तपासणी करणार आहेत. सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिर होईल.याआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी, लोकमान्य संस्था समूहाने केले आहे.
