🟥दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.- महाराष्ट्रातील ७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार.- १७ पैकी ७ मराठी चेहरे
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांवर यंदा महाराष्ट्राची मोहोर उमटली आहे. यंदाच्या १७ विजेत्यांतील तब्बल ७ खासदार महाराष्ट्राचेच आहेत. दिल्लीत शनिवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संसदीय कामकाजमंत्री किरण रिरिजू यांच्या हस्ते अन्य ४ खासदारांनाही विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रातील हिंदीविरोधावरून चर्चेत आलेले भाजपचे निशिकांत दुबे यांनाही सन्मानित करण्यात आले.
संसदरत्न पुरस्कार २०१० मध्ये सुरू करण्यात आले. पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी संसदेत सक्रिय राहणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. संसदेतील सक्रियता, वादविवादात सहभाग, प्रश्न विचारणे आणि कायदेविषयक कामात योगदान या आधारावर दिले जातात. हा पुरस्कार प्राइम पॉइंट फाउंडेशनने सुरू केला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने २०२५ या वर्षीच्या विजेत्यांची निवड केली.
यंदाच्या विजेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, भाजप खासदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि भाजप खासदार स्मिता उदय वाघ यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे रवी किशन, प्रवीण पटेल (भाजप), विद्युत बरन महातो (भाजप) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचाही विजेत्यांत समावेश आहे.
किमान तीन वेळा खासदार म्हणून संसदीय लोकशाहीत सातत्यपूर्ण आणि लक्षणीय योगदान देणाऱ्या चार जणांना विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. यात सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांच्यासह ओडिशातील भाजप खासदार भर्तृहरी महताब, केरळातील क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांचा समावेश आहे.