मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियानांतर्गत नागरिकांचे समस्या समाधान अभियान कक्ष या कक्षाशी संपर्क साधावा.- तहसिलदार समीर माने यांचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसाचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविणेत आलेला आहे. त्या धर्तीवर ना. प्रकाश आबीटरकर ( मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा पालकमंत्री) कोल्हापूर यांनी जिल्हयासाठी मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ दिनांक १ मे २०२५ (महाराष्ट्र दिन) रोजी केलेला आहे.
सदर अभियानाअंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या अडचणी/तक्रारी यांची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करणेकरीता प्रभावी उपाययोजना म्हणून मा. मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियानांतर्गत मा. जिल्हाधिकारीसो, यांचेकडील परिपत्रक क्र. कार्य.७अ/करमणूककर/कावि/१९२/२०२५ दि.१४/०७/२०२५ नुसार नागरीकांचे समस्या समाधान अभियान राबविणेबाबत कार्यवाही करणेत येणार आहे
सदर अभियाना अंतर्गत सर्व नागरीकांनी आपल्या अडीअडचणी संदर्भात. दिनांक २१/०७/२०२५ ते ०८/०८/२०२५ या कालावधीत आजरा तालुक्यातील सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालयात व महसूल विषयक कामाबाबत प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय आजरा येथे नागरिकांचे समस्या समाधान कक्ष स्थापन करणेत येणार असून त्या ठिकाणी नागरीकांनी आपल्या अडीअडचणी संदर्भात अर्ज करणेत यावेत. तरी महसूल विषयक कामकाजाबाबत तहसिलदार कार्यालय आजरा व अन्य शासकिय /निमशासकिय कामकाजाबाबत ज्या त्या शासकिय / निमशासकिय कार्यालयातील नागरिकांचे समस्या समाधान कक्ष या कक्षाशी संपर्क साधावा. असे अवाहन तहसिलदार आजरा समीर माने यानी केले आहे.
