Homeकोंकण - ठाणेठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने भाजप - शिंदे सेनेची डोकेदुखी वाढली?- उपमुख्यमंत्री एकनाथ...

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने भाजप – शिंदे सेनेची डोकेदुखी वाढली?- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी खलबतं.- चर्चांना उधाण

🟥ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने भाजप – शिंदे सेनेची डोकेदुखी वाढली?- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी खलबतं.- चर्चांना उधाण

मुंबई :- प्रतिनिधी.

वरळीतील मराठी विजयी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंबंधी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यात जरी थेट युतीची घोषणा केली नसली तरी उद्धव ठाकरेंबरोबर सहकार्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका ही केवळ महापालिका नसून, तिच्याकडे हजारो कोटींचे बजेट असल्याने ती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटासाठी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. भाजपने या युतीच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करवले असून, त्याचे निष्कर्ष अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना दिले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय, तसेच तांत्रिक अडचणींच्या माध्यमातून वेळ घेण्याची चर्चा देखील झाल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुका होईपर्यंत कोणताही भाजप किंवा शिंदे गटाचा नेता यांनी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असा स्पष्ट सल्ला अमित शहांनी दिल्याचे समजते. शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या अलीकडच्या कृती आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले असून, भाजपनेही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता महायुतीमधील ‘एकसंधतेचा संदेश’ जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचे सांगितल्याचे समजते. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय रेटला होता. या निर्णयाला राज ठाकरेंनी प्रखर विरोध दर्शवला होता. याच मुद्यावरून शिंदे सरकारने राज ठाकरेंना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले, अशी माहिती अमित शहांनी शिंदेंकडून घेतली. त्रिभाषा सूत्र आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरही भाजप नेतृत्व चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले, तर भाजप-शिंदे गटाला कोणते नेते, पक्ष सोबत घेता येतील, याची चाचपणी सुरू झाली आहे. हिंदी भाषिक मतदारांचा कल, मराठी अस्मितेवर आधारित प्रचार, तसेच राजकीय संधींचा योग्य वापर या सगळ्यांचा सविस्तर आढावा शहांनी घेतल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.