मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत – धामणे येथे सेंद्रिय शेतीचा जागर
आजरा : – प्रतिनिधी.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत “एक दिवस, माझ्या बळीराजासाठी” उपक्रमांतर्गत पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.दिनेश शेटे, कृषि सहायक श्री.घनश्याम बिकड, ग्रा.पं.अधिकारी पांडुरंग खवरे व तलाठी अशोक कुंभार यांनी धामणे मधील शेताच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधत तसेच शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी जाणून घेतल्या.. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
धामणे येथील भरघोस व दर्जेदार शेती उत्पादन घेण्यात हातखंडा असणारे प्रगतशील शेतकरी प्रकाश शिवाजी रावण यांचे दोन एकर क्षेत्रावर शिवार फेरी घेण्यात आली. रावण हे गेली १० वर्षे सेंद्रिय शेती करत आहेत. तालुक्यातील प्रमाणित सेंद्रिय शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. यासाठी ते देशी गायींचे संगोपन करत आहेत. त्यांचेकडे गीर जातीच्या ६ गाई आहेत.
सुरवातीस गावातील शेतकरी व उपस्थित अधिकारी श्री. रावण यांच्या शेतावर पोहोचले. सेंद्रिय शेतीचा आत्मा असलेल्या देशी गाईंच्या गोठ्यावर भेट देऊन शेतकऱ्यांना जीवामृत व घन जीवामृत चे प्रात्यक्षिक घेऊन श्री. रावण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.” एक देशी गाय दहा एकर जमीन समृध्द करण्यासाठी पुरेशी असल्याचे त्यांनी सांगितले. आपली शेती समृध्द करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने किमान एका देशी गाइचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवार फेरीमध्ये रावण यांनी लागवड केलेल्या ऊस शेतीची पाहणी शेतकऱ्यांनी केली. पूर्णतःसेंद्रिय निविष्ठा बनवून वाढवलेला त्यांचा १५ पेरांवर दिमाखात डोलणारा ऊस पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फीटले. यासाठी त्यांनी यावर्षी घन जीवामृत चा वेगळा प्रयोग केला आहे. यामुळे ऊसाची उंची, पानांची रूंदी व पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी एकरी ८० टन उत्पादन घेणार असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच भात शेतीमध्ये नवनवीन प्रयोग त्यांनी सुरू ठेवले आहेत. यावर्षी त्यांनी* काला मुछ” या वाणाची लागवड केली आहे. या
लागवडीसाठी त्यांनी एस. आर. टी. या पद्धतीचा अवलंब करुन भरघोस व दर्जेदार पीक घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
यानंतर त्यांनी सोयाबीन लागवडीत केलेल्या सेंद्रिय व प्रूनिंग प्रयोगांबाबत मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर पिकांना लागणारे पाणी सौर उर्जेद्वारे देण्याचा यशस्वी व प्रगत प्रयोग त्यांनी केल्याचे पहावयास मिळाले.
यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. दिनेश शेटे यांनी शेतीमधील समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या व्यथा मांडल्या. शेती व शेतकऱ्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ग्रा. पं. कर्मचारी शुभम धामणकर,महादेव कांबळे,
साधना शिंदे, ऋषिकेश ससाणे, भूपाल पाटील, शिवाजी लोखंडे, तुकाराम सावंत, विश्वनाथ कांबळे, राजू मगदूम, न्यानदेव
आरेकर , प्रक्षिणार्थी कृषि पदवीधर विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.