🟥स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग.- प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश.
🛑राज्यात या तारखे नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
पेरण्यांची घाई नको.- कृषि विभागाचे आवाहन.- सरकारने घेतला आढावा
मुंबई :- प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये 227 प्रभाग असणार आहेत.
🔴राज्यात या तारखे नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
पेरण्यांची घाई नको.- कृषि विभागाचे आवाहन.- सरकारने घेतला आढावा
मुंबई:- प्रतिनिधी
राज्यात 15 जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा आदीचा आढावा घेण्यात आला.
🟥या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. १५ जून नंतरच पावसानंतर मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्यातील १७ जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी, १२ जिल्ह्यात २५ ते ५० टक्के, चार जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के तर एका जिल्ह्यात १०० टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🟥कोकण, गोवा येथे १२ आणि १५ जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करुन ठेवावा, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
