गारगोटी – गडहिंग्लज नवीन रस्ते उकडून ठेकेदाराचे दुर्लक्ष.- तहसील कार्यालय आजरा येथे बैठक संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
गेल्या अनेक दिवसापासून उत्तूर ते कडगाव पर्यंत व उत्तुर ते पिंपळगाव पर्यंतचा जुना रोड उकरून टाकल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी उत्तुर बस स्टॅन्ड रोडवर दिनांक १४ मे २०२५ रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आजरा तहसील कार्यालयात आज दिनांक ५/०६/२०२५ रोजी बैठक झाली. या बैठकीमध्ये तहसिलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, शासनाचे प्रतिनिधी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आर. के.चतुर्वेदी, पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे ये. चिल्का व विनोद पतंगे यांच्यासोबत महामार्ग शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते शिवाजी गुरव, संजय घाटगे, कृष्णा सावंत यांचे दरम्यान बैठक झाली. १४ मे रोजी उत्तुर येथील कमानी जवळील चौकामध्ये उपोषण केले होते, त्यावेळी तहसील कार्यालयामध्ये गारगोटी- गडहिंग्लज या मार्गाबाबतच्या तक्रारीवरून बैठक घेण्याची ठरले होते. सदरचा मार्ग हा नव्याने बनवला जात असून या मार्गाचे नियंत्रण सार्वजनिक उपविभाग आजरा गडहिंग्लज यांचेकडे पूर्वी होते. परंतु सध्या पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यास सुरुवात करावी, कामाचा दर्जा चांगला असावा, सदर महामंडळाचे कार्यालय पुणे व मुंबई येथे आहे जर एखाद्या एक्सीडेंट बाबत किंवा कोणत्याही कारणासाठी लोकांना किंवा पोलिसांना संपर्क साधायचा झाल्यास पुण्या- मुंबईला शक्य नाही त्यामुळे आजरा – गडहिंग्लज – चंदगड या भागात एक कायमस्वरूपी कार्यालय पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे असावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी लावून धरली. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्याचे यावेळी ठरले. तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असून ते चांगल्या प्रतीचे व्हावे असाही मुद्दा चर्चेत आला. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरण रस्ता पूर्ण करून लोकांची गैरसोय दूर करावी अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी दोन्ही बाजूने समन्वय साधण्यासाठी माननीय तहसीलदार समीर माने यांनी पुढाकार घेतला व त्यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी महामंडळाचे अधिकारी यांनी काही त्रुटी असल्यास आम्हाला सुचित करावे आम्ही त्या दूर करू व चांगला रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी कंपनी बाबतचा करार आणि कामाबाबत प्लान इस्टिमेट याची माहिती जनतेला झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी लावून धरण्यात आली त्याच्यावर ही सकारात्मक चर्चा झाली.
गरज पडल्यास पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले व आंदोलनामुळे ताबडतोब आम्ही रस्ता काँक्रिटीकरण सुरू केले आहे असे सांगताना शिवाजी गुरव यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणे हेच योग्य आहे. असे यावेळी संजय घाटगे यांनी सांगून बैठकीमध्ये आभार मानले.
