🟥कर्नाटकात देशातील सर्वात मोठा बँक दरोडा.- चोरट्यांनी बँकेतील 59 किलो सोनं केलं लंपास.
🟥एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा..
🟥कर्नाटकात देशातील सर्वात मोठा बँक दरोडा.- चोरट्यांनी बँकेतील 59 किलो सोनं केलं लंपास.
बंगळुरू :- वृत्तसंस्था
कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील बँकेत देशातील सगळ्यात मोठा दरोडा पडला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेवर योजनाबद्ध दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल ५९ किलो सोनं घेऊन पोबारा केला. या सोन्याची किंमत जवळपास ५३ कोटी रुपये इतकी आहे. चोरट्यांनी ५.२ लाख रुपये लंपास केले. दरोडा टाकताना चोरट्यांनी काळ्या जादूचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे.
🟥विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एका सफाई कर्मचाऱ्याला चोरीबद्दल समजलं. या प्रकरणी २६ मे रोजी मंगोडीत कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकानं तक्रार नोंदवली. २४ मे रोजी (चौथ्या शनिवारी) बँक बंद होती. २५ मे रोजी पार्ट टाईम सफाई कर्मचारी काम करत होता. त्यावेळी त्याला शटरचं कुलूप तुटलेलं दिसलं. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना लगेचच देण्यात आली. बँकेच्या शाखेतून ५९ किलो सोनं चोरीला गेलं आहे. ग्राहकांनी सोनं तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेतलं होतं,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, सहा ते आठ जणांच्या टोळीनं सोन्यानं भरलेली तिजोरी उघडण्यासाठी डुप्लिकेट चावीचा वापर केला. दोन दिवस बँकेच्या शाखेवर नजर ठेवून चोरट्यांनी डल्ला मारला असावा, असा अंदाज आहे.
मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्यांनी अलार्म यंत्रणा निष्क्रिय केली. चोरट्यांना बँकेच्या आतील सगळ्या भागांची, अंतर्गत रचनेची माहिती होती. पोलिसांनी पुढे दिलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. ‘चोरट्यांनी तुटलेल्या खिडकीजवळ एका काळ्या रंगाची बाहुली ठेवली होती. तपास करणाऱ्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कदाचित चोरट्यांनी काळी बाहुली ठेवली असावी. तपासाचा वेग मंदावण्यासाठी चोरटे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा संशय पोलीस अधीक्षकांनी बोलून दाखवला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं दरोडा टाकला. या गुन्ह्यामुळे बँक शाखेच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार केली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करु, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
🟥एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई :- प्रतिनिधी.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनीधींची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्यासोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे असे सांगत एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल याचा अभ्यास करा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
🟥यावेळी संघटनांच्या प्रतिनीधींनी विविध मागण्या केल्या. एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत, यावरही चर्चा झाली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर “धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही पैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
