🔴भारतात ‘मॉक ड्रिल’चा आदेश.- पाकिस्तानची झोप उडाली.- पाक संरक्षणमंत्र्यांना भारताच्या हल्ल्याची भरली धडकी.
🟥दोन आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार.
नवी दिल्ली :- प्रतिनिधी
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करुन २६ पर्यंटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच भारत लष्कारी कारवाई पाकिस्तानवर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे स्पष्ट शब्दांत संदेश दिले होते. त्यातच पाकिस्तानविरोधात भारताची संरक्षण सज्जतेसाठी देशभरात ७ मे रोजी ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले. या नंतर पाकिस्तान आणखी घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत कधीही एलओसीवर मिलिट्री स्ट्राइक करणार असल्याचे म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, भारत एलओसीवरील कोणत्याही प्वाइंटवर कधीही हल्ला करु शकतो. परंतु पाकिस्तान भारताच्या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणार आहे. पाकिस्तानने यापूर्वीच पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु भारत त्याला तयार नाही. कारण त्यामुळे नवी दिल्लीच्या निराधार आरोपांमागील सत्य बाहेर येईल. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापूर्वी पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ता तरार यांनीही, भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या धोका व्यक्त केला होता. पुढील २४-३६ तास महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारताने ७ मे रोजी नागरी सुरक्षेसाठी हवाई हल्ला, ब्लॅकआउट, नागरिक प्रशिक्षणासह रंगीत तालीम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची भीती पाकिस्तानने घेतली आहे. देशात ५४ वर्षानंतर मॉक ड्रिल होत आहे. यापूर्वी १९७१ मध्ये मॉक ड्रिल झाले होते. १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान दरम्यान दोन आघाडींवर युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या ५४ वर्षानंतर आता मॉक ड्रिल होत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सलग अकराव्या दिवशी शस्त्रसंधीची उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानने आठ सेक्टरमध्ये गोळीबार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात दहशतवादविरोधी चर्चा झाली. या चर्चेत रशियाने भारताला ठाम पाठिंबा दिला.

🟥दोन आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार.
मुंबई :- प्रतिनिधी.
कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी अंदमान- निकोबार बेटांवरून आनंदाची बातमी आली आहे. यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये १ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळण्याची शक्यता आहे.
🟥यंदा देशात १०५ % पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. केरळमध्ये मान्सून एक जून २०२५ रोजी दाखल होईल, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात ८ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस धडकणार आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे सांगण्यात येत आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात १९ किंवा २० मे रोजी मान्सूनपूर्व वातावरण तयार होईल. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर लवकर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येणार आहे. यंदा कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस अपेक्षित आहे. उत्तर गोलार्धातील यंदा कमी हिमवृष्टी आणि न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल (IOD) यामुळेही मान्सूनला पोषक वातावरण आहे. मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. यंदा हवामान विभागाने 7 ते 8 जूनच्या दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल, तसेच धरणे आणि जलाशयांची पाणीसाठवणूक वाढण्याची आशा आहे.