🟥राज्यात ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस.-
पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. ( भेंडवळीची भविष्यवाणी – भेंडवळीला शास्त्रीय आधार नाही.)
🟥घरकाम करणाऱ्या लेकीची सासरी पाठवणी.- आमदार भास्कर जाधवांच्या डोळ्यात पाणी.- नात्याचा क्षण पाहून ग्रामस्थही गहिवरले.
बुलढाणा :- प्रतिनिधी.

शेतकरी व राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावची भेंडवळची मांडणी काल बुधवारी संपन्न झाली. भेंडवळच्या घट मांडणीत शेतीविषयक, राजकीय परिस्थिती, देशाची आर्थिक स्थिती, देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात येतात. आज गुरूवारी सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.
भेंडवळची मांडणी ही 370 वर्षांपासूनची स्थानिक परंपरा आहे त्या परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. यावर्षी भेंडवळच्या मांडणीत अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हे फक्त अंदाज आहेत. घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे.शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.
🟥घरकाम करणाऱ्या लेकीची सासरी पाठवणी.- आमदार भास्कर जाधवांच्या डोळ्यात पाणी.- नात्याचा क्षण पाहून ग्रामस्थही गहिवरले
गुहागर :- प्रतिनिधी.

माणूस किती शक्तिशाली असो किंवा मोठा राजकीय पुढारी असो, कुटुंबीयांच्या बाबतीत तो हळवा असतो. अनकेदा मानलेली काही नाती ही कुटुंबाएवढीच जवळची असतात. त्यामुळे, सुख-दु:खाच्या लहान-सहान प्रसंगातून ही नाती उलगडली जातात. गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या ८ वर्षांपासून कामाला होती. आपला मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणेच सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवले होते. लेकीची पाठवणीी करताना बापमाणूस जसा डोळ्यातून पाणी काढतो, तसेच अश्रू या मानलेल्या लेकीची पाठवणी करताना भास्कर जाधवांच्या डोळ्यात तरळले.

🟥भास्कर जाधव यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सुप्रियाचे आज लग्न होते, त्यासाठी सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लहानशा पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागलं.. सात फेरे झाले. त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्करराव जाधव यांचा कंठ दाटून आला. सुप्रियाने पत्नी सौ. सुवर्णाताई आणि सून सौ. स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि ती रडू लागली. आपुलीच्या नात्यांमधून तयार झालेल्या या प्रेमाचा हळवा क्षण पाहताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. तेव्हा, सुप्रियाला बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांच्याही अश्रूंचा बांध फुटला. डोळ्यातील रुमाल काढत त्यांनी आपले अश्रू पुसले.
तसेच, स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना बापाच्या नात्याने सांगितले की, ‘सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे, तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या. भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत, अनेकदा राजकीय मंडळींनाही त्यांचा प्रत्यय आलेला आहे. प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली, कोण वावगे वागले तर ते रोखठोकपणे बोलतात. मग ती व्यक्ती बाहेरची कोणी असो वा घरातली, त्याचा ते विचार करत नाहीत. ते कणखर आहेत, पण तेही किती हळवे आहेत हे आजच्या प्रसंगाने सर्वांसमोर आले. त्यामुळेच, सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही तरीदेखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले, हा त्यांचा विचार आणि कृती ग्रामस्थांना भारावून टाकून गेली.